प्रसाद काथे, झी मीडिया, मुंबई : खळबळजनक बातमी क्रिकेट विश्वातून....  एमसीएच्या निवड समितीमध्ये वशिलेबाजी होत असल्याचा आरोप करण्यात आलाय.. झी मीडियाकडे काही पालकांनी याची तक्रार केलीये.. क्रिकेट प्रशिक्षकांच्या साठमारीत अनेक होतकरु खेळाडूंच्या करियरचा विनाकारण बळी दिला जात असताना एमसीए गप्प का असा सवाल यामुळे उपस्थित झालाय..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मायानगरी मुंबई.. क्रिकेटची पंढरी... या शहरात अनेक तरुण सचिन तेंडुलकर बनायचं स्वप्न उराशी बाळत मैदानावर घाम गाळतात.. मात्र निवड समितीमध्ये वशिल्याचे खेळाडू घुसखोरी करत असल्याचा आरोप झालाय. 


कल्पेश कोळी स्पर्धेतून ३० ऐवजी केवळ २९ खेळाडू निवडण्यात आलेत. यात अपात्र खेळाडूंना संधी देण्यात आल्याचा आरोप नाराज पालकांनी केलाय. या प्रकरणी पालकांनी निवड समितीचे प्रमुख अतुल रानडे यांना जबाबदार धरलंय.


सोळा वर्षांखालील संघाची यादी एमसीएच्या वेबसाईटवर टाकण्यात आली. मात्र या यादीत कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत न खेळलेल्या खेळाडूंचाही समावेश असल्याचा आरोप काही खेळाडूंच्या पालकांनी केलाय.


आपल्या मुलानं भारतासाठी क्रिकेट खेळावं म्हणून मेहनत घेणाऱ्या पालकांच्या या नाराजीला 'झी २४ तास' वाचा फोडत आहे. सोळा वर्षाखालील संघात निवड करण्यात आलेल्या खेळाडूंची यादी झी मीडियाच्या हाती आलीय. कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेत सुमार कामगिरी करणारे हे खेळाडू पुढीलप्रमाणे...


कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धेतला स्कोअर बोर्ड


निलय पवार - ७ धावा


रघुवेंद्र पवार - २२ धावा


रघुवेंद्र पवार - २२ धावा


आर्यन जोशी - ३८धावा


हर्ष मोगवीरा - ४० धावा


शुभम गिरकर - ४८ धावा


या खेळाडूंची ही कामगिरी तीन सामन्यातील होती. इतक्या सुमार दर्जाची कामगिरी करुनही या खेळाडूंची निवड कशी करण्यात आली, याचं समाधानकारक उत्तर 'झी मीडिया'ला मिळू शकलं नाही.. एकीकडं सुमार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा यादीत समावेश केला असताना स्पर्धेच्या तीन सामन्यात ३३.७५ च्या सरासरीनं १३५ धावा करणाऱ्या स्वराज परुळकरला मात्र निवड प्रक्रियेत अपात्र ठरवलं गेलं.


या प्रकरणावर निवड समिती प्रमुख अतुल रानडे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. माध्यमांशी बोलण्यास आपल्याला परवानगी नसल्याचे कारण देत झाल्या प्रकारावर कोणतंही भाष्य करण्यास रानडेंनी टाळलं आहे.