शरद कळसकरचा ताबा सीबीआयला देण्यास सत्र न्यायालयाचा नकार
सीबीआयचा अर्ज न्यायालयाने फेटाळला
मुंबई : शरद कळसकरचा ताबा सीबीआयला देण्यास सत्र न्यायालयानं नकार दिला आहे. कळसकरचा ताबा मागणारा सीबीआयचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. शरद कळसकर हा ३ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडीत असल्यामुळं अशा प्रकारे ताबा देता येणार नसल्याचं सत्र न्यायालयानं म्हटलं आहे.
विशेष म्हणजे शरद कळसकरचा ताबा सीबीआयला द्यायला एटीएसनं ना हरकत प्रमाणपत्र दिलं होतं. याबद्दल न्यायालयानं आश्चर्य व्यक्त केलं आहे.
नालासोपारा स्फोटकं प्रकरणी शरद कळसकरला एटीएसने अटक केली आहे. नालासोपारा स्फोटकं प्रकरणी वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकरला १० ऑगस्टला तर श्रीकांत पांगारकरला त्यानंतर अटक करण्यात आली होती. शरद कळसकरने डाक्टर नरेंद्र दाभोलकर प्रकरणी आपला हात असल्याच मान्य केल्यानंतर सीबीआयने त्याचा ताबा मागितला होता.