COVID Update: देशात कोरोनामुळे 6 जणांचा मृत्यू; मुंबईत JN.1 च्या 19 रूग्णांची नोंद
COVID Update: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनामुळे 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील तीन, छत्तीसगडमधील दोन आणि आसाममधील एका मृत्यूचा समावेश आहे
COVID Update: देशात दिवसागणिक पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. देशात वाढणाऱ्या रूग्णसंख्येने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. देशात मंगळवारी कोरोनाच्या एकूण 475 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय 3,919 एक्टिव्ह रूग्ण असल्याची माहिती आहे.
कोरोनामुळे 6 जणांच्या मृत्यूची नोंद
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात कोरोनामुळे 6 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील तीन, छत्तीसगडमधील दोन आणि आसाममधील एका मृत्यूचा समावेश आहे. कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट आल्यानंतर आणि थंडीच्या दिवसात संक्रमणामध्ये वाढ होत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
JN.1 व्हेरिएंट किती धोकादायक?
मिळालेल्या माहितीनुसार, 5 डिसेंबरनंतर 31 डिसेंबर 2023 रोजी कोविडची 841 नव्या प्रकरणांची नोंद करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी, सुमारे 92 टक्के होम आयसोलेशनमध्ये असताना बरे झाल्याची माहिती आहे. हाती असलेल्या डेटावरून असं दिसून येतंय की, JN.1 सब व्हेरिएंटमुळे प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत नाही किंवा हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूंमध्येही वाढ होत नाही.
मुंबईत 19 लोकांना कोरोनाची लागण
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितल की, मुंबईत कोरोना व्हायरसच्या JN.1 सब-व्हेरिएंटचे 19 रुग्ण आढळले आहेत. बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी दक्षा शाह यांनी पीटीआय दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जीनोम सिक्वेन्सिंग विश्लेषणामध्ये JN.1 सब व्हेरियंटसाठी पॉझिटिव्ह आढळलेल्या 22 नमुन्यांपैकी 19 मुंबईतील आहेत.
मुंबईत पहिल्यांदाच 19 रुग्णांना JN.1 सब-व्हेरिएंटची लागण झालीये. राज्यात जेएन 1 ची एकूण 250 प्रकरणांची नोंद करण्यात आली असून मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक प्रकरणे पुणे आणि नागपूरमध्ये आहेत. याशिवाय मुंबईतील एक्टिव्ह रुग्णांची संख्या 166 आहे. ज्यापैकी 37 जणांचा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.