सत्ताबदलाचे श्रेय अल्पसंख्याक समाजाला - शरद पवार
`अल्पसंख्याक समाजाने भाजपविरोधात मतदान केले.`
मुंबई : राज्यात तीन पक्षांचे जरी सरकार आले तरी याचे सगळे श्रेय हे अल्पसंख्याक समाजाला जाते, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. अल्पसंख्याक समाजाने भाजपविरोधात मतदान केले म्हणून राज्यात सत्ताबद्दल दिसून येत आहे, असे पवार म्हणालेत. त्यामुळे आता विरोधकांकडून पवारांना काय प्रत्युत्तर मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे.
पवार यांनीही महाराष्ट्रातील सत्ताबदलाचे श्रेय अल्पसंख्याक समाजाला दिले. अल्पसंख्याक समाजानं कुणाला हरवायचे हे ठरवलेले होते. म्हणूनच सत्ताबदल झाला, असे वक्तव्य शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या बैठकीत बोलताना केले. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाने भाजपला मतदान केले नाही. जे भाजपला हरवू शकतात, त्यांना मतदान केले, असं पवारांनी यावेळी सांगितले.
समाजातील अनेक गोष्टींचा परिणाम सामाजिक न्याय विभागात असलेल्या घटकांना बसतो. यासाठी आपण जागरूक राहावे लागेल. एक जबरदस्त संघटन उभारून ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांच्या पाठीशी उभे राहून, त्यांना न्याय मिळवून देण्याची व्यवस्था आपण करायला हवी. आज तीन पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सत्ता स्थापन केली आहे. आपल्या पक्षाने लहान घटकांना न्याय मिळण्यासाठी सामाजिक न्याय व अल्पसंख्याक विभागाची जबाबदरी स्वतःकडे घेतली आहे. राज्यातील सर्व लहान घटकांना शिक्षण, सुविधा, महिला सुरक्षा अशा सर्व गोष्टीत बळकटी मिळण्याचा प्रयत्न यातून होईल, असे पवार यावेळी म्हणालेत.
राज्यात तीन पक्षांची सत्ता आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे तीन भाग होतात. यातील आपल्याला मिळालेल्या एका भागाचे आपण चार भाग करत आहोत. एक सामाजिक न्याय विभागात काम करण्यासाठी, दुसरा अल्पभूधारकांसाठी, तिसरा महिलांच्यासाठी, तर चौथा संघटनाचे काम करणाऱ्या इतर लोकांसाठी. मागासवर्गियांसाठी अधिकारांचा योग्य वापर कसा करायचा याची नीती आपण ठरवू. यासाठी तुमच्या सर्वांची साथ मिळण्याची गरज आहे. राज्यातील सर्व समाज घटकांना योग्य न्याय कसा मिळेल याची जबाबदारी राज्य सरकारची असेल व ती चोखपणे पार पाडण्यात येईल, असे पवार म्हणालेत.