मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र सामना मधून पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना आणि भाजपवर टीका करण्यात आली आहे. मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्या नटीमागे कोण? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. मुंबईची सतत बदनामी हा त्या कारस्थानाचाच एक भाग आहे. मुंबईस पाकिस्तान म्हणणारी एक नटी, मुख्यमंत्र्यांना अरे-तुरे म्हणणारा एक वृत्तवाहिनीचा संपादक यांच्या मागे कोण आहेत? महाराष्ट्रातील मराठी माणसाने एक व्हावे असा हा कठीण काळ आलाच आहे.' असं देखील सामनातून म्हटलं आहे.


'मुंबईला आधी पाकिस्तान, नंतर बाबर म्हणणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष उभा राहतो हे दुर्दैवच म्हणायला हवे.' अशी टीका देखील भाजपवर करण्यात आली आहे. मुंबईस पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्य़ांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय रजपूत, क्षत्रिय मते मिळविण्यासाठी हा खटाटोप आहे. असा आरोप देखील सामनातून करण्यात आला आहे.


'ठाकरे' हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा 'ब्रॅण्ड' पवार नावाने चालतो. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचे व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच 'ब्रॅण्ड'चे एक घटक आहेत. या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात 'ठाकरे' ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी 'ठाकरे' ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल. असं देखील सामनातून म्हटलं आहे.