Exclusive | नकारात्मक सिद्धांतावर महाविकास आघाडी सरकार स्थापन : देवेंद्र फडणवीस
राज्यातील विरोधी पक्षाच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीची कामगिरी कशी राहिली याबाबत जाणून घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून...
मुंबई : राज्यातील उद्धव ठाकरे सरकारला आता दोन वर्ष पूर्ण होत आहेत. या दोनवर्षात सरकारने काय साध्य केलं. सरकारची कामगिरी कशी राहिली. कोणते महत्वाचे निर्णय घेतले? कोणत्या सामाजिक निर्णयांचा लोकांना फायदा झाला. याबाबत सिंहावलोकन करणे गरजेचे आहे. राज्यातील विरोधी पक्षाच्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीची कामगिरी कशी राहिली याबाबत जाणून घेऊन राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून...
'झी२४तास'चे संपादक निलेश खरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली Exclusive मुलाखत
प्रश्न - तीन वेगळ्या विचारांचे सरकार स्थापन झाल्यानंतर जनहिताचे निर्णय घेतले गेले असं वाटतं का?
देवेंद्र फडणवीस -
हे सरकार फक्त नरेंद्र मोदी तसेच भाजप विरोधातून निर्माण झाले. ज्या सरकारच्या स्थापनेचे उद्दिष्टच नकारात्मक आहे. त्यामुळे नकारात्मक सिद्धांतावर तयार झालेले सरकार सकारात्मक काम करू शकत नाही.
या सरकारचे एका वाक्यात वर्णन करायचे झाल्यास, There is government but there is no governance म्हणजेच हे सरकार आहे परंतु शासन नाहीये. केवळ सरकार असून चालत नाही. शासन असावं लागतं, ते शासन या सरकारमध्ये दिसत नाही.
समाजातल्या कुठल्याही घटकाला या सरकारला न्याय देता आलेले नाही. केवळ दोन वर्ष कांगावा करण्यात काढले. यांनी काही मानसं अशी ठेवली आहेत की, जी सकाळी उठून नकारात्मक बोलतात. दिवस नकारात्मकतेवर काढतात. कारण त्यांच्याकडे नक्की काय काम केलं हे सांगण्यासारखं काहीच नाही.
प्रश्न - पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड परिस्थिती हातळण्याबाबत राज्याचं कौतुक करतात, असे शिवसेना किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात. तुम्ही म्हणत आहात की, सरकार सकारात्मक काम करत नाही. यावर काय सांगाल
देवेंद्र फडणवीस -
खरं म्हणजे आपली स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे यापेक्षा चांगले उदाहरण नाही. आपले राज्य देशातील सर्वात प्रगतीशील राज्य आहे. आपली आरोग्य सेवा इतर राज्यांपेक्षा प्रगतीशील आहे. तरीही देशातील 35 टक्के मृत्यू महाराष्ट्रात का?
पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना, प्रत्येक राज्याच्या उणीवा किंवा चांगल्या बाबींबाबत बोलतात. त्यामुळे एखाद्या वेळेस मोदी यांनी ठाकरे सरकारबद्दल बोलले असतील तर, तेच नेहमीसाठी मिरवण्यात येते.
त्यासोबतच, महाराष्ट्र आणि केरळमुळे देशाची परिस्थिती बिघडली असे देखील केंद्राने म्हटले होते. मग त्याविषयी का बोलत नाहीत. 'खोटं बोल पण रेटून बोल' या एकाच बाबतीत या सरकारमध्ये एकवाक्यता आहे.
त्यानंतर सरकारमधील सर्वच जण त्याची पडताळणी न करता तेच रेटून बोलतात. ते काहीही बोलले तरी, कोरोनामध्ये महाराष्ट्र सरकार अपयशी असल्याचे आकडेवारी सांगते.
प्रश्न - अनेकदा विरोधी पक्षाकडून आरोप झाले की, मुख्यमंत्री घरात बसून काम करतात. परंतु मुख्यमंत्री म्हणतात की टेक्नॉलॉजी आहे. त्याचा वापर करून प्रशासनाचे नियंत्रण करू शकत असेल तर का म्हणून घराबाहेर पडावं?
देवेंद्र फडणवीस -
हे खरं तर दुबळं स्पष्टीकरण आहे. मी तर नेहमीचं म्हटलंय की घराबाहेर पडून काम करायचं की नाही हा त्यांचा निर्णय आहे. परंतु सगळं जर घरी बसून चालवता आलं असतं तर, कुठे जाण्याची आवश्यकताच पडली नसती.
ग्राऊंड लेवलवर नक्की काय काम सुरू आहे. हे घरात बसून कळत नाही. आमचा प्रश्नय की, कोरोना काळात एका तरी रुग्णाची रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली का ? कोणाचीही परिस्थिती जाणून घेतली नाही.
काही कारणामुळे मुख्यमंत्र्यांनी घरून काम केलं असेल परंतु त्याचं मुख्यमंत्री समर्थन करीत असतील तर हे योग्य नाही.
-
प्रश्न - दोन वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. त्याआधी तुम्ही देखील सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला. पण आजही त्या प्रयत्नाची चर्चा सातत्याने होते. त्याबाबत जाणून घ्यायला आवडेल
देवेंद्र फडणवीस -
मी त्या प्रकरणावर पाणी सोडलं आहे. ते जे काही झालं ते वाहून गेलं आहे. मी स्पष्टपणे सांगितलं आहे की, जेव्हा पाठीत खंजीर खुपसला जातो. त्यावेळी राजकारणात जिवंत रहावं लागतं. तो जिवंत राहण्याचा प्रयत्न होता. मी जे केलं ते योग्य. याचं मी समर्थन करीत नाही. परंतु त्यावेळी ते करणं आम्हाला योग्य वाटलं म्हणून केलं.
प्रश्न - 2014 साली भाजप राष्ट्रवादीसोबत जाणार होती. परंतू तसं झालं नाही. म्हणून 2019 साली राष्ट्रवादी भाजपला समर्थन देण्यापासून मागे फिरली. असं विश्लेषण केलं जातंय. हे कितपत योग्य?
देवेंद्र फडणवीस -
हे अतिशय चुकीचं विश्लेषण आहे. 2014 साली राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. 2014 मध्ये शिवसेनेसोबतच आम्ही जाणार होतो. त्यावेळी शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची मागणी केली.
आमचे संख्याबळ 122 होते. आवाजी मतदानाने तेव्हा विश्वासदर्शक ठराव संमत झाला. त्यावेळी राष्ट्रवादीने निश्चित अशी भूमिका घेतली ज्यामुळे आम्हाला फायदा झाला. त्याही वेळीदेखील आम्ही राष्ट्रवादीची मदत नव्हती घेतली.
त्यामुळे त्यावेळी आम्ही काहीतरी केलं म्हणून आता काही तरी झालं हा मुद्दा गैरलागू आहे. ह्यावेळी जे झालं त्याचं वेगळं विश्लेषण करता येईल.
---