Crocodile pups found in Dadar swimming Pool: दादर इथल्या महात्मा गांधी जलतरण तलावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. या जलतरण तलावात मगरीचे पिल्लू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे पिल्लू येथे कसे आले? यावर काय कार्यवाही होणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.दादरच्या महात्मा गांधी जलतरण तलावात अडीच फूट मगरीचे पिल्लू आढळले आहे. महानगरपालिकेच्या या जलतरण तलावाच्या बाजूला खाजगी प्राणी संग्रहालय आहे इथून ही मगर जलतरण तलावात आली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान या प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी ताब्यात घेतले पाहिजेत तसेच हे अनधिकृत प्राणी संग्रहालय बंद केले पाहिजे अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लहान मुलं नागरिक सगळे या ठिकाणी पोहायला येत असतात एखाद्याच्या जीविताशी आल्यानंतर याला जबाबदार कोण ? या जलतरण तलावाच्या बाजूला अनधिकृत खाजगी प्राणी संग्रहालय आहे ते बंद केलं पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


आज पहाटे 5.30 च्या सुमारास दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील ऑलिंपिक आकारच्या जलतरण तलावात मगरीचे पिल्लू आढळून आले आहे. हे पिल्लू तज्ज्ञांच्या मदतीने पकडण्यात आले‌ असून ते खात्याच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच हे मगरीचे पिल्लू तरण तलावात कुठून आले, याची चौकशी करण्यात येईल आणि त्यानुसार आवश्यक ती प्रतिबंधात्मक काळजी भविष्यात घेण्यात येईल, अशी माहिती उपायुक्त (उद्याने)  किशोर गांधी यांनी दिली आहे.


रोज पहाटे तरण तलाव सदस्यांसाठी सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे तरण तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. यानुसार आज पहाटे तरण तलावाचे निरीक्षण करीत असताना ऑलम्पिक आकाराच्या व शर्यतीसाठीच्या तरण-तलावात (Olympic size Racing Swimming Pool) मगरीचे पिल्लू आढळून आल्याची माहिती जलतरण तलाव आणि नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन यांनी दिली. त्यानंतर तज्ञांच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करीत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आले आहे. हे पिल्लू वनखात्याच्या ताब्यात देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही सुरु असल्याचेही ते म्हणाले.



जुलैमध्ये सापही आढळले


महात्मा गांधी जलतरण तलावात प्राणी सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.जून, जुलैमध्ये सलग दोन महिन्यांमध्ये दोन साप आढळून आले होते. त्यानंतर येथे पोहायला येणाऱ्या सभासदांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या जलतरण तलावाच्या ठिकाणी साप येण्याच्या या वारंवारच्या घटनांमुळे याचा शोध महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला होता. यावेळी हे साप बाजुच्या जागेमध्ये उभारण्यात आलेल्या प्राणिसंग्रहालयातील असावेत असे अंदाज बांधला वर्तविण्यात आला होता. त्यामुळे याठिकाणी सापांचा वावर होण्यास कोणतेही अनुकूल वातावरण नसताना जर बाजुच्या प्राणिसंग्रहालयातून हे साप सुटून येत असतील आणि त्यांची देखभाल जर संबंधित प्राणिसंग्रहालयाला करता येत नसेल तर ते बंद करण्यात यावे अशी मागणी जलतरण तलावाच्या सभासदांकडून  करण्यात आली होती. पण यावर नंतर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.