Taj Hotel Mumbai : मुंबईत उभ्या असणाऱ्या आणि भारतात येणाऱ्या प्रत्येकासोबतच देशातील नागरिकांसाठीसुद्धा आकर्षणाचा विषय ठरणाऱ्या ताज हॉटेलवर एक मोठा हल्ला झाल्याची खळबळजनक बातमी नुकतीच समोर आली आहे. उपलब्ध माहितीनुसार 5 नोव्हेंबरला ताज हॉटेल समुहावर (Taj Hotel Group) सायबर हल्ला झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ताज हॉटेवर झालेला हा सायबर हल्ला इतका मोठा होता की, Cyber Attackers कडून यामध्ये जवळपास 15 लाख ग्राहकांच्या खासगी माहितीवर डल्ला मारण्यात आला आहे. ही माहिती परत करण्यासाठी हल्लेखोरांनी तब्बल 5000 डॉलर्सची खंडणी मागितली असून, भारतीय चलनानुसार ही किंमत फार मोठी आहे. शिवाय हल्लेखोरांनी माहिती परत देण्यासाठी काही अटीसुद्धा समोर ठेवल्याचं सांगण्यात येत आहे. सदर प्रकरणी सुरु असणाऱ्या चर्चा आणि ग्राहकांमध्ये असणाचं चिंतेचं वातावरण पाहता ताज हॉटेल समुहाकडून ग्राहकांच्या माहितीचा तपशील सुरक्षित असून, सध्या गुप्तचर आणि संरक्षण यंत्रणांना या प्रकरणाची माहिती देण्यात आल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात येत आहे.  


हल्लेखोरांच्या अटी काय? 


ET च्या वृत्तानुसार हल्लेखोरांनी लाखो ग्राहकांच्या माहितीच्या बदल्यात 5 हजार डॉलरची मागणी केली आहे. डीएनए कुकीज (Dna Cookies) असं या सायबर हल्ला करणाऱ्या टोळीचं नाव असून, सध्यातही ग्राहकांची ही माहिती कोणाच्याही हाती देण्यात आली नसल्याची धमकी त्यांनी दिली आहे. ही माहिती परत देण्यासाठी मोठी रक्कमच नव्हे, तर हॅकर्सनी काही अटीही टाटा समुहापुढं ठेवल्या आहेत. 


हेसुद्धा वाचा : 'या' दोन तरुणी सांभाळणार रतन टाटा यांचा अब्जोंचा व्यवसाय; उद्योग जगतात त्यांचीच चर्चा 


चर्चा करण्यासाठी एखाद्या बड्या अधिकाऱ्यानंच मध्यस्ती करावी, तुकड्या तुकड्यांमध्ये ही माहिती दिली जाणार नाही, डेटाचे सँपल मागितले जाऊ नयेत या अटी त्यांच्याकडून समोर ठेवण्यात आल्या आहे. प्राथमिक माहितीनुसार या सायबर हल्लेखोरांनी 5 नोव्हेंबरला 1000 कॉलम एंट्री असणारी माहिती लीक केली होती. आता टाटा समुहाकडून याबाबत कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


माध्यमांच्या हाती आलेल्या माहितीनुसार ताज हॉटेल्सवर झालेल्या या सायबर अटॅकमुळं जवळपास 15 लाख ग्राहकांवर याचा थेट परिणाम होताना दिसणार आहे. ग्राहकांचा खासगी दूरध्वनी क्रमांक, त्यांच्या घरचा पत्ता, मेंबरशिप आयडी आणि तत्सम माहिती या हॅकर्सच्या हाती लागली असून, ही माहिती 2014 ते 2020 या वर्षांमधील असल्याचं सांगण्यात येत आहे. 


दरम्यान, सदरील प्रकरणाचं गांभीर्य पाहता इंडियन होटल्स कंपनी लिमिटेड (IHCL) च्या प्रवक्त्यांनीही यामध्ये लक्ष घातलं. जिथं लीक झालेली माहिती नॉन-सेंसिटिव असून त्यामध्ये कोणहीही संवेदनशील माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. टाटा समुहाला मात्र ग्राहकांची चिंता असल्यामुळं आता यंत्रणा सदर प्रकरणी तपास करत आहेत अशीही माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.