प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : अल्पावधीत इतक्या हजारांपर्यंत कर्ज मिळेल, कोणत्याही कागदपत्रांशिवया घ्या लोन, असे अनेक मेसेज आपल्या मोबाईलवर येत असतात. झटपट लोन घेण्यासाठी अनेक गरजू लोन अॅप डाऊनलोड करतात. यानंतर कर्जासाठी ते आवश्यक ती पूर्तता आणि त्यांच्या खात्यात पैसे जमाही होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तात्काळ कर्ज मिळालं म्हणून सुरुवातीला त्यांना आनंद होतो. पण इथूनच त्यांची खरी फरफट सुरु होते. लोन घेताना आपण डाउनलोड केलेल्या मोबाईल अॅमधील सर्व सूचना न वाचता आपण टिक करतो ज्यात आपल्या मोबाईल मधील सर्व संपर्क क्रमांक  बघण्याची संमती अॅपला देतो आणि इथेच मोठी चुकी होते. 


घेतले 8 हजार भरावे लागले 93 हजार
हॅप्पी अॅपच्या साह्याने मुंबईच्या मुलुंड इथल्या एका व्यक्तीने 8 हजार रुपयांचं लोन घेतलं, त्याचे हप्ते ही भरले. मात्र काही दिवसाने त्याला अजून पैसे दे नाहीतर तुमच्या नातेवाईकांना तुमचे आक्षेपार्ह फोटो पाठवू अशी धमकी यायला सुरुवात झाली. आपली बदनामी होईल या भीतीने त्या व्यक्तीने तब्बल 93 हजार रुपये भरले. पण यानंतरही त्याला धमक्या सुरुच होत्या. अखेर त्या व्यक्तीने सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली.


तपासात धक्कादायक माहिती 
महाराष्ट्र सायबर सेलने गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती हाती लागली. ज्या मोबाईल नंबरहून फोन येत होते तो माणूस धुळे इथला एक भाजी विक्रेता होता. त्याच्याकडे अगदी साधा मोबाईल होता. पोलीस त्याच्यापर्यंत पोहचले, पण त्याच्या मोबाईल नंबरचा कोणाकडून तरी गैरवापर सुरु असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.


हे फोन कोणी केला याचा तपास सुरू केला असता कर्नाटकच्या धारवाड मधून 5 जणांना अटक करण्यात आली. हे पाचही आरोपी शिक्षित असून एम बी ए , कॉम्प्युटर सायन्स , आय टी आय , पदवीधर असे युवक होते. या पाचही जणांना अटक केली करण्यात आली.


आपण फसवले गेलो असेल तर तक्रार करा आणि अश्या आरोपीना गजा आड टाका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबईत असे 27 जण फसवले गेले होते, पण त्यापैकी एक जणच तक्रार देण्यासाठी पुढे आला यामुळेच अश्या आरोपींचे फोफावते आणि सामान्य नागरिक बळी पडतो असं पोलिसांनी सांगितलं.