Cyber Sextortion In Mumbai: माटुंगा रेल्वे स्थानकामध्ये एका रेल्वे कर्मचाऱ्याने रेल्वे समोर उडी घेत आत्महत्या केली आहे. या व्यक्तीच्या खिशात आढळून आलेल्या सुसाईड नोटमध्ये आपण सेक्सटॉर्शनला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे. सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून आपल्याला एक टोळी त्रास देत होती, असा उल्लेख चिठ्ठीमध्ये आहे. सोशल मीडियावरुन कोमल शर्माशी माझी ओळख झाली. माझे अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी देत आम्हाला पैसे दिले नाहीत तर व्हिडीओ पोस्ट करण्याची धमकी तिने दिली होती असं या व्यक्तीने आत्महत्येच्या चिठ्ठीत म्हटलं आहे. 


अपघात झाल्याची पत्नीला दिली माहिती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

9 ऑक्टोबर रोजी या व्यक्तीने कामावर जात असल्याचं सांगत पहाटे 6 वाजताच घर सोडलं. सकाळी साडेदहा वाजता त्याच्या पत्नीने त्याला फोन केला. मुलांच्या शाळेसंदर्भात बोलायचं आहे असं तिने सांगितलं असता या व्यक्तीने मी कामात अडकलोय आपण नंतर सविस्तर बोलू असं सांगून फोन ठेवला. दुपारी साडेतीन वाजता या व्यक्तीच्या पत्नीला पोलिसांनी फोन करुन माटुंगा रेल्वे स्टेशनवर तुमचा पती ट्रेनच्या धडकेत जखमी झाले आहेत असं सांगितलं. तुमच्या पतीला गंभीर दुखापत झाल्याचं या महिलेला पोलिसांनी सांगितलं. ती रुग्णालयामध्ये पोहोचण्याआधीच तिच्या पतीचा मृत्यू झाला होता. 


3 जणांचा चिठ्ठीत उल्लेख


अनेकदा या व्यक्तीला पैशांसाठी ब्लॅकमेल करण्यात आल्यानंतरही त्याने या आरोपींना एक पैसाही दिला नव्हता, असा उल्लेख एफआयआरमध्ये आहे. मात्र नंतर मी दिल्ली पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केल्याचं कोमल शर्मा नावाच्या महिलेनं या व्यक्तीला सांगितलं. त्यानंतर प्रेम प्रकाश नावाची व्यक्ती सायबर विभागाचा अधिकारी म्हणून या व्यक्तीला फोन करुन धमकावू लागला. 2 लाख रुपये दे नाहीतर तुझ्याविरुद्ध कारवाई करु असं या व्यक्तीला प्रेम प्रकाशने सांगितलं. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये या व्यक्तीने विकास कुमार नावाच्या व्यक्तीचाही उल्लेख केला असून ऑनलाइन व्हिडीओ आणि इमेज शेअरिंग वेबसाईटचा अधिकारी म्हणून आपल्या संपर्कात होता असं म्हटलं आहे.


घरच्यांना दिली नव्हती माहिती


"सेक्सटॉर्शनसाठी आपल्याला त्रास दिला जात असल्याचं पीडित व्यक्तीने सांगितलं नव्हतं," अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. आत्महत्या केल्यानंतर आपल्या आईशी आणि पत्नीशी पोलिसांनी कशापद्धतीने संपर्क साधावा याबद्दलची माहितीही या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत दिली होती. सध्या पोलीस या तिन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.