मुंबई : निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढत असताना हे वादळ पुढे पुढे सरकत आहे. काही तासात रायगड आणि मुंबई किनाऱ्यावर धडकू शकते. दरम्यान, वादळाचा धोका लक्षात घेऊन आतापर्यंत विविध ठिकाणाहून ४० हजार लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.  एनडीआरएफच्या दलाने या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. तसेच मुंबईतील वर्सोवा बीचवर एनडीआरएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तर रायगड जिल्ह्यातील एकूण १३ हजार ५४१ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.


मुंबईच्या किनाऱ्यापासून १९० किमी दूर



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून १९० किमी दूर आहे. हे वादळ आता हळूहळू पुढे सरकत आहे. काही तासांत ते किनाऱ्यावर धडकू शकते, अशी स्थिती आहे. त्यापार्श्वभूमीवर बीएमसी, एनडीआरआफ, अग्निशमन दल हायअलर्टवर आहे. हवामान विभागाने मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.  मुंबईमध्ये सकाळच्या प्रहरात वाऱ्याचा वेग कमी होता. मात्र, काही अंशी वाऱ्याचा वेग वाढल्याचं पाहायला मिळत आहे. 


मुंबईला वादळाचा धोका कमी 


निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला आहे. अलिबागपासून ९५ किमीवर वादळ आले आहे. ४ तासांत अलिबागमध्ये धडकणार आहे. अलिबागच्या दक्षिणेला वादळ धडकणार आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईला चक्रीवादळाचा धोका कमी आहे, अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे उपसंचालक कृष्णानंद होसाळीकरांची 'झी २४ तास'ला दिली आहे.


पालघर येथील नागरिकांचे स्थलांतर 


वादळापासून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई विमानतळावरील उड्डाणे कमी करण्यात आली आहेत , करोनाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत फक्त ५० उड्डाणे होत होती ती हि आता कमी करून फक्त १९ वर आणली आहेत यात ११ उड्डाणे घेतील तर ८  विमान मुंबईत येणार आहेत त्यातही बदल होऊ शकतो म्हणून प्रवाश्यानी घरातून निघण्याआधी परिस्थिती तपासूनच निघण्याचे आवाहन विमानतळ प्रशासनाने केले आहे.



निसर्ग चक्रीवादळ हे अलिबागमध्ये धडकणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं असलं तरीही या वादळाचा धोका हा रायगड, रत्नागिरी, पालघर, मुंबई या भागातही आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी जोरदार वारे वाहतात. समुद्राला काही ठिकाणी उधाण आले आहे. जिथे जास्त धोका आहे या ठिकाणच्या प्रशासनाने किनारपट्टीवरील नागरिकांचं स्थलांतरण केले आहे.


निसर्ग चक्रीवादळाचा गुजरातमध्येही परिणाम जाणवायला लागला आहे. दमण परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. सध्या या भागामध्ये खबरदारी म्हणून पोलीस सतत पेट्रोलिंगवर आहेत. तसंच प्रशासनाकडून लोकांना घरीच थांबण्याचं आवाहन केले जात आहे. तर दुपारी १२ वाजता समुद्रात भरतीचा इशारा देण्यात आलेला आहे.