Ganeshotsav 2022 : गणपतीने कोरोनाचं विघ्न हरलं, गणेशोत्सव आणि दहीहंडी निर्बंधाविना
दहीहंडी आणि गणेशोत्सव (Ganeshotsav Festival 2022) कोणत्याही कोरोनो निर्बंधाशिवाय (Corona Restriction) साजरा करण्यात येणार आहे.
मुंबई : दहीहंडी आणि गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनामुळे गेले 2 वर्ष महाराष्ट्रातील हे मोठे सण हे साधेपणाने साजरे करण्यात आले. मात्र या सणांबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळेस दहीहंडी आणि गणेशोत्सव (Ganeshotsav Festival 2022) कोणत्याही कोरोनो निर्बंधाशिवाय साजरा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. (dahi handi and ganeshotsav festival 2022 will celebrted to without any covid restriction cm eknath shinde given info)
परवानगीसाठी एकखिडकी योजना
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगीसाठी अनेकदा संबंधित कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागतात. मंडळांच्या कार्यकर्त्यांची ही कटकट कमी करण्यासाठी राज्य सरकारने एकखिडकी योजना राबवणार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे आता मंडळांची परवानगीची कटकट कमी होणार आहे. तसेच या निर्णयामुळे सार्वजनिक मंडळांना दिलासा मिळाला आहे.
गणपती मुर्ती उंची मर्यादा काढली
आतापर्यंत गणपती मुर्तीबबात उंचीची मर्यादा होती. घरगुती आणि सार्वजनिक मंडळांसाठी राज्य सरकारकडून याबाबत काही नियम घालून देण्यात आले होते. मात्र हे उंचीबाबतचे नियमही हटवण्यात आले आहेत.
खड्डे बुजवण्याचे आदेश
गणेशोत्सवात आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढली जाते. या आगमन आणि विसर्जन मार्गावर अनेक खड्डे असतात. या आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
कोकणात जाण्यासाठी टोलमाफी
कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. अनेक जण हे आपले खासगी वाहन घेऊन गावी निघतात. अशांना सरकारने दिलासा दिला आहे. राज्य सरकारने यंदाही नेहमीप्रमाणे कोकणात जाणाऱ्यांसाठी टोलमाफीचा घेण्यात आला आहे.