गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई : मुंबईतल्या कुरार परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नी माहेरी निघून गेली आणि वारंवार विनवण्या करून देखील घरी परतत नसल्याने एका पतीने आपल्या पोटच्या मुलीला फासावर लटकवलं. हा धक्कादायक प्रकार मालाडच्या कुरार परिसरात घडला असून याप्रकरणी पोलिसांनी अजय गौड या व्यक्तीला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्नी घरी परत यावी यासाठी अजयने आपल्या मुलीला फासावर लटकवलं तर मुलाला जमिनीवर झोपवून त्याच्या अंगावर सफेद चादर टाकत दोन्ही मुलांचे फोटो काढले आणि पत्नीला पाठवले. 'मुलगा मेला आणि मुलगी गळफास घेतेय लवकर मुंबईत परत ये', अशी धमकी त्याने पत्नीला दिली. 


नेमकी घटना काय?


अजय गौड याला दारूचं व्यसन आहे. नशेत तो पत्नी आणि दोन मुलांना बेदम मारहाण करायचा. या मारहाणीला कंटाळून त्याची पत्नी दोन वर्षांपूर्वी दोन्ही मुलांना घेऊन उत्तर प्रदेशला आपल्या गावी निघून गेली. मात्र, अजय गौड काही दिवसांपूर्वी तेरा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांच्या मुलाला घेऊन मुंबईत परतला होता. त्यानंतर नशेत पुन्हा त्याने मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. 


गौड याचा भाऊ सूचित याने कुरार पोलिसांना तक्रार दिली होती. अजयने त्याच्या तेरा वर्षांच्या मुलीला प्लास्टिकच्या बादलीवर उभे करत तिच्या गळ्यात ओढणीने फास टाकत पंख्याला लटकवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, असं या तक्रारीत नमुद करण्यात आलं आहे. अजयने मुलीला पायाखालची बादली हटवण्यास सांगितलं, याला नकार दिल्याने अजयने पंखा सुरु करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरून मुलीने आरडाओरडा सुरु केला. मुलीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेत अजयला अडवलं.


कुरार पोलिसांनी अजय गौड याच्या ताब्यातून दोन मुलांची सुटका केली. तसंच अजयला अटक केल्याची माहिती कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांनी दिली आहे.