लेकीचं वडिलांना अनोखं दान! पोलीस पित्याला यकृत देत वाचवलं जीव
लेकीचं सगळीकडे चर्चा
मुंबई : बापलेकीचं नात हे खास असतं. लेकीच्या चेहऱ्यावरील हास्याकरता बाप कायम झटत असतो. तर लेकीसाठी तिचा बाप हा जगातील बेस्ट सुपरहिरो असतो. ज्याच्यासाठी ती काहीही करायला तयार होते. अशाच एका बाप-लेकीची कहाणी... लेकीने आपल्या बापाला जीवनदान दिलंय....
मुंबई पोलिस दलामध्ये कार्यरत असलेले पीएसआय दिलीप सेल यांचे यकृत खराब झाले होते. यकृत खराब झाल्यामुळे हेपेटायटिस बीचा त्रास दिलीप सेल यांना सुरू झाला. तसेच त्यांना कोरोनाची लागण देखील झाली.
यावेळी डॉक्टरांनी त्यांना यकृत बदलण्याचा सल्ला दिला. दिलीप सेल यांची 22 वर्षांची मुलगी प्रियंका सेल हिने वडिलांना यकृत दान करण्याचा निर्णय घेतला.
अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई येथे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. यकृत प्रत्यारोपण व्यवस्थितरित्या झाले आणि जणू मुलींनेच आपल्या वडिलांना दुसरा जन्म दिला.
यकृत प्रत्यारोपणानंतर दिलीप सेल ठणठणीत आहेत आणि त्यांना प्रमोशन देखील मिळाले असून ते आता पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करत आहेत.
अपोलो हॉस्पिटल्सने पश्चिम भारतात 150 हून अधिक यकृत प्रत्यारोपण केले आहे. अशाप्रकारे प्रत्यारोपण पूर्ण करून सामान्य व्यक्तीप्रमाणे रुग्णालयातून घरी जाऊन एखादा व्यक्ती पूर्वी प्रमाणे जीवन जगतो त्यावेळी आनंद होतो.
लेक कायमच वडिलांचा विचार पहिला करते. पण वयाच्या 22 व्या वर्षी वडिलांनी यकृत दान करण्याचा प्रियंकाचा निर्णय हा नक्कीच कौतुकास्पद आहे. या निर्णयाने प्रियंकाने समाजात सकारात्मक विचार पेरला आहे.
अवयवदानाची जनजागृकता निर्माण होणे गरजेचे आहे. यामुळे एका व्यक्तीला नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळते.