कर्जमाफी : अजित पवारांची शिवसेनेला सरकार स्थापनेची ऑफर
शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला थेट सत्तास्थापनेची ऑफर दिली.
मुंबई : शेतकरी कर्जमाफीवरुन विधिमंडळात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला थेट सत्तास्थापनेची ऑफर दिली.
एकत्र येऊन आकड्यांचं गणित जुळवू आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जसकट कर्जमाफी देऊ, असे अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केले. मुंबई संकटात असताना महाराष्ट्र मदतीला धावतो, आता शेतकरी संकटात असताना मुंबईने मदतीसाठी पुढे यावं असे आवाहन अजित पवारांनी केले.
तसंच यासाठी मुंबई महापालिकेनं आपल्या ठेवी द्याव्यात असे खुले आव्हान यावेळी अजित पवार यांनी शिवसेनेला दिले. त्याचेवळी या सरकारने कर्जमाफी नाही तर कर्ज वसुली केली आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली. यावरच ते थांबले नाही, तर एकत्र येऊन सरकार बनवू आणि शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी देऊ, अशी ऑफर त्यांनी शिवसेनेला दिली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच शिवसेना मिळून १४५ च्या आकड्याचे गणित जमवू आणि शेतकऱ्यांना सरसकट थेट कर्जमाफी देऊ. शिवसेनेला खरंच शेतकाऱ्यांविषयी सहानुभूती असेल तर पालिकेच्या ६० हजार कोटींच्या ठेवी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी द्याव्यात, असे ते म्हणालेत.