मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव तीव्र होत असताना, सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मुंबईतही सरकारी निर्बंधांमुळे खासगी कार्यालयातील उपस्थिती कमी झाल्याचे दिसून येत आहे. कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम सुरू केल्याने लोकल ट्रेन मधील गर्दीत घट झाल्याचे दिसून येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना प्रतिबंध घालण्यासाठी शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती 50 टक्के इतकी करण्यात आली आहे. तर खासगी कार्यालयांनी वर्क फ्रॉम होमच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिल्यामुळे लोकल ट्रेन सेवेतील प्रवाशांच्या संख्येत दररोज घट होत असल्याचे दिसून येत आहे.


गेल्या एका महिन्यातील लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहता, मध्य रेल्वे मार्गावर 3 लाख प्रवासी तर, पश्चिम रेल्वे मार्गावर 2 लाख प्रवासी संख्या कमी झाल्याचे दिसून आले आहे.


कोरोनाचा राज्यात बेफाम संसर्गामुळे सरकारने कडकडीत निर्बंध लागू केले आहेत, परंतु मुंबईतील लोकल ट्रेनच्या प्रवासावर कोणतेही अतिरिक्त निर्बध नाहीत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच राज्य सरकारने पहिल्या लोकलपासून ते सकाळी 7 पर्यंत, दुपारी 12 ते 4 आणि रात्री 9 ते शेवटच्या लोकलपर्यंत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासास परवानगी दिली होती. 


फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लोकल ट्रेनमधील प्रवाशांची गर्दी वाढली होती. परंतु पुन्हा राज्यात कोरोनाने डोके वर काढल्यामुळे, लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे लोकल प्रवाशांची गर्दी रोडावल्याचे चित्र आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार पश्चिम रेल्वे मार्गावर 2 लाख 31 हजार प्रवासी तर, मध्य रेल्वे मार्गावर 3 लाख प्रवाशांची संख्या कमी झाली आहे.