मुंबई : राज्यातील विमानतळांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि विकास करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने निवेदनाद्वारे केलेल्या सुचनाबाबतही सकारात्मक विचार करून अंमलबजावणी करण्यात येईल तसेच राज्यातील विमानसेवांचा कालबद्ध विकास केला जाईल अशी ग्वाही महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांनी दिलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्र राज्यातील विविध शहरांतील विमानतळांचा विकास व नवीन सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांच्या समवेत वर्ल्ड ट्रेड सेन्टर मधील कार्यलयात झालेल्या संयुक्त बैठकित सहभाग घेतला.


महाराष्ट्र राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणचे व्हाईस चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.


चर्चेप्रसंगी अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रामुख्याने कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील शेतमालाला प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय माल वाहतूक विमानसेवा सुरू करण्याची मागणी केली. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण गतीने पूर्ण करण्याची मागणी केली.


औरंगाबाद विमानतळावरून नवीन रूट सुरू करणे, जळगाव विमानतळावरून विमान सेवा वाढवून मालवाहतूक सेवा सुरु करणे, नाशिक विमानतळावरील सुविधा वाढवणे अश्या विविध मागण्याचा अभ्यास अहवाल सादर करून झपाट्याने वाढणाऱ्या प्रवासी व माल वाहतुकीकरिता जिल्हास्तरावर विमानतळ विकास प्राधिकरण व महाराष्ट्र चेंबरच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण केंद्र उभारून  युवकांना विमानसेवेशी निगडित रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगितले.


राज्यातील जिल्ह्यांना शहरासाठी जोडण्यासाठी नवीन हवाई मार्ग व विमानसेवा सुरू करण्याच्या सूचना वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी केली. चेंबरच्या सिविल एव्हिएशन समितीचे सुनीत कोठारी यांनी या प्रसंगी विमान सेवा पुरवणाऱ्या कंपनांच्या इंधनाचा मूल्य वर्धित करा  मध्ये कपात करून तो १ टक्के करावा असे सुचविले.


आजच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण घोषणा


कोल्हापूर विमानतळासाठी लागणारा निधी महाराष्ट्र सरकार कडून मंजूर केला जाणार.


रत्नागिरी विमानतळासाठी  लागणारा निधी महाराष्ट्र सरकार कडून मंजूर केला जाणार आहे.


शिर्डी येथे स्वतंत्र कार्गो टर्मिनल उभारणार


अमरावती येथील विमानतळासाठी भारत सरकारकडून ५२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून पहिल्या टप्प्यातल्या ६.५ कोटी रुपये मिळाले आहेत. तसेच अमरावती विमानतळासाठी महाराष्ट्र सरकारकडून अतिरिक्त २३ कोटी मिळणार असल्याचे दिपक कपूर यांनी सांगितले.


नोव्हेंबर २०२२ पासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरु करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत जाहीर करण्यात आला.


पुणे-शिर्डी-नागपूर विमान सेवा १८ फेब्रुवारी २०२२ पासून अलाइन्स एअर सुरु करणार


पुणे-औरंगाबाद-नागपूर सेवा 1 मार्च पासून सुरू होणार