आरोग्य मंत्री दीपक सावंत यांचा राजीनामा
राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा सोपवलाय. दीपक सावंत यांच्या मंत्रीपदाची मुदत आज संपतेय. सावंत यांच्या राजीनाम्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दीपक सावंत यांनाच पुन्हा मंत्रीपदाची शपथ घ्यायला लावणार? की नव्या चेहर्याचा मंत्रीमंडळात समावेश करणार? याबाबत उत्सुकता आहे.
शिवसेना भाजपाचे ताणले गेलेले संबंध लक्षात घेता नव्याने मंत्रीमंडळात कुणाचा नव्यानं समावेश करण्याऐवजी आरोग्य खात्याचा पदभार शिवसेनेच्या एखाद्या मंत्र्यांकडे दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दीपक सावंत यांची विधान परिषदेच्या आमदारकीची मुदत ७ जुलै २०१८ रोजी संपली आहे. त्यानंतर सहा महिन्यांत त्यांना पुन्हा विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून येणं आवश्यक होतं... नियमांनुसार, सहा महिने कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसताना मंत्रीपदावर राहता येतं. मात्र, या सहा महिन्यात कुठल्याही सभागृहाचे सदस्य न झाल्यास मंत्रीपद संपुष्टात येते.