मुंबई: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नावाने मातोश्रीला गंडा घालणाऱ्या डिलिव्हरी बॉयला मुंबई पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. धीरेन मोरे असे या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. आदित्य ठाकरे यांनी कोणतीही ऑनलाइन खरेदी केली नसताना धीरेन त्यांच्या नावाने खोटे पार्सल घेऊन मातोश्रीवर जायचा. तब्बल चारवेळा त्याने मातोश्रीवर आदित्य ठाकरे यांच्या नावाने खोटे पार्सल दिले. मात्र, गुरुवारी आदित्य ठाकरे घरात असल्यामुळे या डिलिव्हरी बॉयचे बिंग फुटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धीरेन कमी किमतीच्या वस्तू पार्सलच्या माध्यमातून मातोश्रीवर पोहोचवून तो मोठी रक्कम वसूल करायचा. सर्वप्रथम धीरेनने आदित्य ठाकरे याच्या नावाने पार्सल तयार करून त्या पार्सलमध्ये हलक्या दर्जाचे हेडफोन पॅक करून ते 'मातोश्री'वर पोहोचवले होते. 'मातोश्री'वरील कर्मचाऱ्यांनी ते पार्सल परस्पर घेऊन धीरेनला पैसे दिले होते. यामुळे धीरेनची हिंमत आणखीनच वाढली. त्यामुळे आणखी तीनवेळा त्याने अशीच खोटी पार्सल मातोश्रीवर नेऊन पैसे उकळले. 


मात्र, गुरुवारी धीरेन पार्सल देण्यासाठी मातोश्रीवर गेला तेव्हा आदित्य ठाकरे घरात होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांना आदित्य यांना पार्सलबाबत सांगितले. मात्र, आदित्य यांनी आपण काहीच मागवले नसल्याचा खुलासा केला. त्यावेळी चोरी पकडली गेली हे लक्षात येताच धीरेनने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्याला पकडून खेरवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले.