Dengue Case: महाराष्ट्रात डेंग्यूचा कहर; दर तासाला दोघांना लागण
Maharashtra Mumbai Dengue Case: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, यावर्षी 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 2 लाख 34 हजार 427 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. या रूग्णसंख्येपैकी महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 17 हजार 531 इतकी आहे.
Maharashtra Mumbai Dengue Case: मुंबई आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा डेंग्यूने डोकं वर काढल्याचं दिसून येतंय. नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्टनुसार, राज्यात दर तासाला सरासरी दोन रुग्णांना डेंग्यूची लागण होताना दिसतेय. रिपोर्टमध्ये हा मोठा खुलासा झाल्याने चिंता वाढली आहे. डेंग्यूच्या बाबतीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पहिल्या क्रमांकावर उत्तर प्रदेशाचं नाव आहे. डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात नोंदवले गेले असल्याची माहिती आहे.
डेंग्यूच्या रूग्णांची आकडेवारी
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, यावर्षी 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 2 लाख 34 हजार 427 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहे. या रूग्णसंख्येपैकी महाराष्ट्रात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 17 हजार 531 इतकी आहे. तर प्रथम क्रमांकावर असलेल्या उत्तर प्रदेशात सर्वाधिक 33 हजार 75 डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बिहारचा नंबर लागतोय. बिहारमध्ये एकूण 19 हजार 672 रुग्ण आढळले आहेत.
मुंबई देखील डेंग्यूच्या आजाराने कहर केलेला दिसतोय. राज्यभरातील लोकांच्या आरोग्यावर डासांमुळे होणाऱ्या आजारांचा मोठा परिणाम झाला आहे. आरोग्य विभागाने नुकतीच आकडेवारी जाहीर केली आहे.
जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, संपूर्ण देशाची तुलना केल्यास महाराष्ट्रात सात टक्के रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईत 4 हजार 300 रुग्ण आढळले आहेत. बीएमसी आरोग्य विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी रिपोर्टिंग युनिट्समध्ये वाढ झाल्यामुळे अनेक प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.
डेंग्यूचे वाढते रुग्ण पाहता आरोग्य विभागाने काही सूचना जारी केल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
आकडेवारीनुसार, गेल्या चार वर्षांच्या तुलनेत यंदा महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळल्याचं दिसून येतंय. 2020 मध्ये डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 3 हजार 356 होती, तर 2021 मध्ये राज्यातील रुग्णांची संख्या 12 हजार 720 झाली. यानंतर 2022 मध्ये राज्यात 8 हजार 578 डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचं दिसून आलं होतं. यावर्षी म्हणजेच नोव्हेंबर 2023 पर्यंत राज्यात एकूण 17 हजार 541 लोकांना या गंभीर आजाराची लागण झाल्याचं दिसून येतंय.