भाजी खरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं, अन्यथा खैर नाही - उपमुख्यमंत्री
बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांना आणि नियम मोडणाऱ्यांना अजित पवारांचा इशारा
मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. तर देखील भाजी खरेदीसाठी सकाळच्या बाजारात मोठी गर्दी होते. लॉकडाऊन दरम्यान होणारी ही गर्दी धोका आणखी वाढवत आहे.
'बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे कोरोना विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. कोरोना विरुद्धचा लढा जिंकायचा असेल तर बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असला तरी अनेक ठिकाणी लोकं बेजबाबदारपणे वागत आहेत. अत्याआवश्यक सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. पण याचा लोकं गैरफायदा घेत आहेत. रोज भाजी खरेदीसाठी लोकं मोठी गर्दी होत आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रोज वाढत आहे. पण लोकं मात्र याबाबत गंभीर नाही. अनेक ठिकाणी बाजारात मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सरकारला यापुढे आणखी कडक पाऊलं उचलण्यासाठी लोकं भाग पाडत आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत राज्यात ३२० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ज्यापैकी १२ रुग्णांचं मृत्यू झाला आहे. रोज ही संख्या वाढत चालली आहे.