बिहारची निवडणूक ही देशातील पहिली डिजिटल निवडणूक - फडणवीस
सर्वात जास्त युवा लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची ओळख झाली आहे.
अमित जोशी, झी मीडिया, मुंबई: बिहारची विधानसभेची निवडणूक ही देशातील पहिली डिजिटल निवडणूक असेल. या माध्यमातून गेल्या १५ वर्षात बिहारने साधलेली प्रगती मतदारांपर्यंत पोहचवणे आवश्यक असल्याचे मत भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बिहारच्या भाजप प्रदेश कार्यकारणीशी संवाद साधला. त्यावेळी डिजिटल माध्यमाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन फडणवीस यांनी प्रदेश कार्यकारणीला केले. सर्वात जास्त युवा लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची ओळख झाली आहे. यामध्ये बिहारमध्ये सर्वात जास्त युवा वर्ग असल्याचे समोर आले आहे. तेव्हा जास्तीत जास्त युवा वर्गापर्यंत पोहचण्याच्या सूचना फडणवीस यांनी राज्य कार्यकरणीला केल्या आहेत.
बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे. ज्येष्ठ भाजप नेते भूपेंद्र यादव हे बिहारसाठी पक्ष प्रभारी असून फडणवीस हे त्यांच्यासमवेत निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील, असे दिल्लीतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्याबरोबर आशीष शेलार यांच्यासह काही नेत्यांना बिहारमध्ये पाठविले जाण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणावरुन महाविकासआघाडी सरकार आणि बिहार सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. सुशांत राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करत बिहार सरकार आणि महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी याप्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे CBI देण्याची मागणी केली होती. मात्र, महाविकासआघाडी सरकार हा तपास मुंबई पोलिसांकडूनच व्हावा, या भूमिकेवर ठाम होते. परंतु, गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाची सर्व सूत्रे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.