`तुलना केवळ परिस्थितीशी नको, कृतीशीही करा` मुख्यमंत्र्यांच्या टोल्याला फडणवीसांचं उत्तर
लॉकडाऊनला विरोध करणा-यांना मुख्यमंत्र्यांनी लगावलेल्या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई : लॉकडाऊनला विरोध करणा-यांना मुख्यमंत्र्यांनी लगावलेल्या टोल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रस्त्यावर उतरुन लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची आमची तयारी आहे. मात्र तुलना केवळ परिस्थितीशी करु नका सरकारच्या कृतीचीही करा असं आवाहन त्यांनी राज्य सरकारला केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाबाबत माहिती दिली. त्याचबरोबर येत्या 2 दिवसात परिस्थिती बदलली नाही तरी लॉकडाऊनचा इशारा दिला. त्याचबरोबर त्यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या विरोधकांनाही चिमटे काढले.
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तत्काळ उत्तर दिले आहे. फडणवीस यांनी फेसबुक आणि ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांना दिले आहे. यासाठी त्यांनी इतर देशांनी केलेल्या उपायोजनांचे दाखलेही दिले. 'केवळ विरोधक तसंच तज्ज्ञांचा दुस्वास करुन कोरोना जाणार नाही तर प्रत्यक्षात काय करतो याचं प्रबोधनात्मक विवेचन केल्यास अधिक फरक पडेल' असं फडणवीस म्हणालेत
नक्की काय म्हणाले देवेंद्र फडणवीस...
फ्रान्सने तिसर्यांदा लॉकडाऊन लावला...
पण, 120 अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले...
हंगेरीत ‘वर्क फ्रॉम होम’...
पण, युरोपियन युनियनमध्ये भांडून हक्काचा निधी पदरी पाडून घेतला...
डेन्मार्कमध्येही तीच परिस्थिती...
पण, एप्रिल 2020 मध्येच सर्वच घटकांना पॅकेज...
ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध उठण्यास मदत...
पण, 2,20,000 उद्योग आणि 6 लाखांवर कर्मचार्यांना मदत
एवढेच नाही तर वेतन न मिळणार्यांना 800 युरोंपर्यंत मदत !
बेल्जियमने परत लॉकडाऊन केलाय...
पण, 20 बिलियन युरोचे पॅकेज जाहीर केलंय...
पोर्तुगाल सरकारने नागरिकांची ये-जा थांबविली आहे...
पण, 13 बिलियन युरोचे पॅकेज मार्च 2020 मध्येच जाहीर केले...
आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत...
पण, 7.4 बिलियन युरोंचे पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय...
फिलिपाईन्समध्ये कडक निर्बंध आहेत...
पण, 3.4 बिलियन डॉलर्सचे पॅकेज सप्टेंबरमध्येच दिलंय...
युके,जर्मनी कुठेही जा,सर्वांनीच काही ना काही दिलंय...
तुलना केवळ परिस्थितीशी नको,सरकारच्या कृतीशीही व्हावी,एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!
विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही,तर आपण प्रत्यक्ष काय करतो,याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबविण्यात अधिक मदत करेल.
होय, आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत...
आणि आमची पुन्हा तयारी आहे, रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची...