मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. फडणवीसांसोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार आशिष शेलारही उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांची भेट झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निसर्ग चक्रीवादळानंतर देवेंद्र फडणवीस हे कोकणाच्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यानंतर कोकणासाठी मदत करण्याच्या मागणीचं निवेदन घेऊन भाजपचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले. दौऱ्यातलं सत्य मांडलं. वादळग्रस्तांना अजूनही मदत मिळाली नाही. लोकांना गुरांसारख राहावं लागतंय, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी या भेटीनंतर दिली. तसंच विजेच्या पोलसाठी पैसे मागितले जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. 


चक्रीवादळाच्या १० दिवसानंतरही कोकणात मदत पोहोचली नाही. काही ठिकाणी तर दोन बिस्कीटचे पुडे आणि ३ मेणबत्त्या पोहोचल्या आहेत. आपण जाहीर केलेली १० हजार रुपयांची थेट मदत तत्काळ लोकांना उपलब्ध करून द्या, असं निवेदन भाजपने मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. चक्रीवादळाच्या ११ दिवसानंतरही शासन-प्रशासनाचे अस्तित्व जमिनीवर दिसून येत नाही, अशी टीकाही फडणवीस यांनी केली आहे.


याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली होती. पाहणीनंतर शरद पवार यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. 


मुख्यमंत्र्यांकडे फडणवीसांच्या या मागण्या 


- वादळग्रस्तांना घरभाडं द्या


- मच्छीमारांना कर्जमाफी द्या 


- फळबाग मालकांना अधिकची मदत द्या


- मच्छिमारांना डिझेल परतावा द्या 


- छोट्या दुकानदारांना मदत द्या 


- रेशनचे धान्य तात्काळ उपलब्ध करून द्या


- केरोसिन उपलब्ध करून देण्याची घोषणा, पण अजूनही मिळालं नाही. तेही तत्काळ द्या


- पेणच्या गणेशमूर्तीकारांना मदत द्या 


- घरबांधणीसाठीचे दीड लाख रुपये कमी, ग्रामीण भागासाठी २.५० लाख आणि शहरी भागासाठी ३.५० लाख रुपयांचे अनुदान द्या 


- बागायतदारांना ५० हजार हेक्टरी मदत अत्यंत कमी. बागांचं नुकसान झाल्यामुळे पुढचं १० वर्ष उत्पन्न बुडणार आहे. सरकारने गुंठ्याला ५०० रुपये मदत दिली आहे. बाग साफ करायलाच मोठा खर्च येणार आहे.


- १०० टक्के अनुदानातून फळबाग योजना लागू करा


- पर्यटन व्यवसायासाठी सरकारने कर्जाची हमी घेऊन यांना दीर्घकालीन कर्ज उपलब्ध करून द्यावं


- केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत मासेमारी आणि फळबाग यासाठी अनेक योजना घोषित केल्या आहेत. त्याचा लाभ प्राधान्यक्रमाने कोकणाला कसा मिळेल, यादृष्टीने तातडीने नियोजन करावे


- शाळा/समाजभवन/वाचनालये असे अनेक सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तांचे नुकसान झाले आहे. त्यांनाही तातडीने मदत करण्यात यावी.


-  जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्न तयार झाला आहे. सुका चार्‍याची उपलब्धता करून देण्यात यावी.