मुंबई : राज्यपालांचं निवासस्थान असलेल्या राजभवनावर हालाचाली वाढू लागल्या आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेत्यांसोबत राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेतली. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा, असं निवेदन भाजप नेत्यांनी राज्यपालांना दिलं. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर विनोद तावडे, प्रविण दरेकर, आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे भाजप नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली असतानाच महाविकासआघाडीचे नेते संध्याकाळी ६ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. 


उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्याबाबतचं नवीन पत्र  महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना देणार आहेत. दरम्यान आज संध्याकाळी ५ वाजता राजभवनावर हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधिश दीपांकर दत्ता शपथविधी आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. 


दुसरीकडे सोमवारी रात्री उशीरा मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठकही पार पडली. शरद पवार आणि उद्धव ठाकरेदेखील या बैठकीला हजर होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, परिवहन मंत्री अनिल परब यांचीही बैठकीला उपस्थिती होती. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर केला नाही, तर पुढे उद्भवणारी परिस्थिती आणि पर्याय यावर चर्चा झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. याचसोबत राज्यातील कोरोनाच्या स्थिती आणि त्यावरच्या उपाययोजना याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय.


सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरेंना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठवण्यात यावं, अशी विनंती राज्य मंत्रिमंडळाने पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली आहे. 


उद्धव ठाकरेंनी २८ नोव्हेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. शपथ घेताना मुख्यमंत्री विधानसभा किंवा विधानपरिषदेचे आमदार नव्हते. नियमानुसार मुख्यमंत्री अथवा मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या व्यक्तीला पुढच्या ६ महिन्यात विधानसभा किंवा विधानपरिषदेचं आमदार व्हावं लागतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचे ठरले होते. परंतु कोरोनाच्या आपत्तीमुळे राज्यातील विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणारी निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलली. याच ९ जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडून जाणार होते.


...म्हणून मुख्यमंत्री नाही तर, अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झाली मंत्रिमंडळाची बैठक