बदलापूर: राज्याच्या लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. जनतेने निवडून दिलंय तर किमान मंत्रिमंडळ विस्तार तरी करा, असे फडणवीस यांनी म्हटले. ते बुधवारी बदलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अटल संध्या कार्यक्रमात बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिंचन घोटाळ्यात ट्विस्ट, अजित पवारांना क्लीन चीट नजरचुकीने


यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, या सरकारमध्ये विरोधाभास असल्याने  बरीच कसरत करावी लागत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा असे घडले आहे, की इतके दिवस मंत्रिमंडळ तयार झालेले नाही. तुम्हाला जनतेने राज्य दिलेय, तर किमान मंत्रिमंडळाचा विस्तार तरी करा, असे फडणवीस यांनी सांगितले. 


अजित पवारच आमचे उपमुख्यमंत्री - संजय राऊत


दरम्यान, ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार ३१ डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. गेल्या आघाडी सरकारच्या काळात झालेल्या सिंचन घोटाळ्यामध्ये ट्विस्ट आल्याने मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे अडले आहे. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट देण्याच्या भूमिकेवर एसीबीने घूमजाव केले. त्यामुळे गृहमंत्रीपदाच्या शर्यतीत अजित पवार यांचे नाव मागे पडल्याची चर्चा आहे. 



२८ नोव्हेंबरला शिवतीर्थावर ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला होता. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील प्रत्येक दोन मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र, यानंतर २७ दिवस उलटूनही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारकडून तात्पुरते खातेवाटप जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार गृह आणि नगरविकास खाते शिवसेनेला मिळणार आहे. तर राष्ट्रवादीच्या पदरात वित्ता, जलसंपदा, ग्रामविकास आणि गृहनिर्माण ही महत्त्वाची खाती पडली आहेत. काँग्रेसला महसूल, शालेय शिक्षण ही महत्त्वाची खाती मिळाली आहेत.