पुढील उपचारांसाठी धर्मा पाटील यांना जे जे रुग्णालयात हलवलं
सरकारी यंत्रणा, बाबूशाही आणि दलालीचा फटका बसल्यानं वैतागून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ८० वर्षीय धर्मा पाटील यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना आता जे जे रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
मुंबई : सरकारी यंत्रणा, बाबूशाही आणि दलालीचा फटका बसल्यानं वैतागून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ८० वर्षीय धर्मा पाटील यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. त्यांना आता जे जे रुग्णालयात हलवण्यात येत आहे.
कालपासून मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात धर्मा पाटील यांच्यावर उपचार होते. पाटील यांनी काल मंत्रालयात विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
धर्मा पाटील यांची बागायती जमीन औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारनं संपादित केली. पाच एकर जमीनीसाठी त्यांना अवघ्या चार लाख रुपयांचा मोबदला मिळाला. धर्मा पाटील यांच्या शेजारच्या शेतकऱ्यांना मात्र जमिनीच्या मोबदल्यात कोट्यवधींच्या रकमा देण्यात आल्या.
दलालाच्या माध्यमातून जमीन विकल्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळाला. पण धर्मा पाटलांनी दलालांची मदत घेतली नाही... आणि त्याचाच फटका ८० वर्षाच्या या धर्मा पाटलांना बसला... गेले तीन महिने या अन्यायाविरोधात धर्मा पाटील न्याय मागण्यासाठी सरकार दरबारी तळवे झिजवताय... पण बाबूशाहीच्या हृदयाला पाझरं फुटला तर नवल... अखेर धर्मा पाटलांनी मंत्रालयात विष घेतलं. पाटील यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.