Uddhav Thackeray : मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन चूक केली का? उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकलं?
राज्याच्या सत्तासंघर्षावर माजी खासदार निलेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. कोर्टाच्या निकालावरुन निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसंच युवर टाईम स्टार्ट नाऊ असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी डिवचलं.
Maharashtra Political Crisis : राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदे सरकारच्या बाजूनं लागला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळं सरकार परत आणण्याचा प्रश्नच येत नाही, असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केले आहे. कोर्टानं उद्धव ठाकरेंबाबत अनेक निरीक्षणे नोंदवली आहेत. उद्धव ठाकरेंचं नेमकं काय चुकलं? राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंनी चूक केली? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तसेच मविआ नेत्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टानं विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूनं कौल दिला. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर परखड निरीक्षणं नोंदवली आहेत. विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाता उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळं उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याचा प्रश्नच येत नाही. सुप्रीम कोर्ट त्यावेळची 'जैसे थे' परिस्थिती प्रस्थापित करु शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात म्हटल आहे.
महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनीही बोट ठेवल
याचाच अर्थ घाईघाईत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची चूक ठाकरेंना भोवल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतल्या मित्रपक्षांच्या नेत्यांनीही त्यावरच बोट ठेवल आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलीय. उद्धव ठाकरेंनी विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवा होता असंही मविआच्या नेत्यांनी म्हंटल आहे.
शरद पवारांच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या निर्णयावर नाराजी
उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडी सरकार कोसळण्याआधी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात उद्धव ठाकरेंनी पहिल्या टप्प्यातच माघार घेतली, असं पवारांनी लिहिल आहे. दरम्यान, राजीनामा देणं ही भले कायदेशीर चूक असेल. मात्र, गद्दारांनी माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणं मला मान्य नव्हतं, त्यामुळं राजीनामा दिल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितले.
घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याची ऐतिहासिक वेळ आली होती. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला नसता तर कदाचित त्यांचं मुख्यमंत्रिपद सुप्रीम कोर्टाला पुन्हा बहाल करण्यात आलं असते. मात्र, भावनेच्या भरात उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. वैयक्तिक आयुष्य असो, नाहीतर राजकारण, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घ्यायचा नसतो, हाच धडा यातून घ्यायला हवा.