Directorate of Revenue Intelligence Seized 40 kg Gold: केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये छापेमारी केली आहे. आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसहीत देशातील 4 शहरांमध्ये केलेल्या छापेमारीमध्ये मोठ्याप्रमाणात सोनं, चांदींबरोबरच रोख रक्कम डीआरआयने जप्त केल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.


काय सापडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डीआरआयच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, अररिया, मुंबई, मथुरा आणि गुरुग्राममध्ये छापेमारी करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये डीआरआयने 40 किलो सोनं जप्त केलं आहे. 70 सोन्याची बिस्कीटं जप्त करण्यात आली आहेत. हे सर्व सोनं परदेशातून देशात आणण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. तसेच 6 किलो चांदी आणि 5.43 कोटी रुपये रोख रक्कम डीआयआरने जप्त केली आहे. 500 रुपयांच्या चलनी नोटांच्या स्वरुपात ही रोख रक्कम आढळून आली आहे. या प्रकरणामध्ये एकूण 12 जणांना अटक करण्यात आल्याची माहितीही डीआरआयने दिली आहे.



या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध सुरु


सध्या डीआरआयने जप्तीमधील माल ताब्यात घेतला असून आरोपींची चौकशी सुरु आहे. एवढ्या मोठ्याप्रमाणात परदेशातून सोनं भारतात कसं आणलं? या साऱ्या सोन्या-चांदीचा आणि रोख रक्कमेचा मालक कोण आहे? कोणाच्या सांगण्यावरुन आणि कशासाठी या पैशांचा वापर केला जात होता? यामागे एखादी टोळी सक्रीय आहे का? असेल तर त्याची व्यप्ती किती आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. हा पैसा कुठून कुठे आणि नेमका कोणत्या कारणासाठी वळवला जायचा हे सुद्धा पोलीस शोधत आहेत.


मिळालेले गुप्त इनपुट्स अन् अनेक दिवसांची तयारी


सदर छापेमारीसंदर्भात मागील अनेक आठवड्यांपासून तयारी सुरु होती अशी माहिती समोर आली आहे. सोन्याची तस्करी आणि काळ्या बाजारातील विक्री करणाऱ्या एका संभाव्य टोळीसंदर्भातील काही ठोस इनपुट्स डीआरआयला मिळाले होते. याच इनपुट्सच्या आधारे पूर्वतयारीने छापेमारी करण्यात आली असता हे घबाड हाती लागलं आहे. आता यामागे नेमके किती लोक आहेत? ही तस्करी कशी चालायची याची माहिती घेतली जात आहे.