मुंबई: टाटा समूहा विरोधात चार वर्षांहून अधिक काळ सुरु असलेल्या न्यायालयीन लढाईवर सायरस मिस्त्री यांनी आज प्रतिक्रिया दिली. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आपण व्यक्तिशः निराश झालो. आपण जे काही केले ते प्रामाणिकपणे केले. माझा हेतू स्पष्ट होता आणि आहे त्यामुळे आजही मला शांत झोप लागते, असेही मिस्त्री यांनी स्पष्ट केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सायरस मिस्त्री यांनी टाटा समूहावर गंभीर आरोप केले होते. मात्र प्रत्यक्षात न्यायालयाचा निकाल टाटा सन्सच्या बाजूने लागला. त्यावर मिस्त्री यांनी एक निवेदन जारी केले. ज्यात ते म्हणतात की, सुप्रीम कोर्टाच्या निकालाने आपण प्रचंड निराश झालो.


टाटा समूहात चांगल्या नेतृत्वाबद्दल आपण गेले चार वर्ष झगडत होतो. संचालकांनी निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडावे आणि या टाटा समूहातील निर्णय प्रक्रिया पारदर्शक असावी आणि सुशासन असावे, असा आपला आग्रह होता. यापुढे टाटा समूहात समभागधारकांच्या हक्कांचे आणि मूल्यांचे संरक्षण होईल, असा आशावाद मिस्त्री यांनी व्यक्त केला.


त्याशिवाय यापुढे कोणत्याही निर्णयात आपण थेट ढवळाढवळ करणार नाही, असेही मिस्त्री यांनी स्पष्ट केले आहे. आता सर्वच गोष्टी निकालात निघाल्याने आपल्याला शांत झोप लागेल, असे मिस्त्री यांनी म्हटलं आहे. मिस्त्री कुटुंबीयांची टाटा सन्समध्ये १८.४ टक्के हिस्सेदारी आहे.