नवी दिल्ली :  महाराष्ट्र राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये लोकसभा मतदारसंघ अदलाबदलीवरून अद्याप चर्चा सुरू आहेत. काँग्रेस - राष्ट्रवादीची महाआघाडी कधीपर्यंत अस्तित्वात येणार, याची उत्सुका शिगेला पोहोचली आहे. राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा आहे. लोकसभा निवडणुकांचे पडघम आता सुरु झाले आहेत. २०१४ ने भाजपने पुर्ण बहुमत मिळवले. २०१९ ला महाराष्ट्रात लोकसभेच्या काँग्रेसकडे दोन तर राष्ट्वादीकडे चार जागा होत्या, पण  साडेचार वर्षात बरंच पाणी पुलाखालून गेले. मोदी सरकारची लोकप्रियता घटली. त्यामुळेच आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संधी साधत एकत्रित लढण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागा अदलाबदलीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दिल्लीत बैठका सुरू आहेत. दिल्लीत शरद पवार यांच्या घरी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. त्यात काही मतदारसंघावर तोडगा निघाला. यात तोडगा निघालेले मतदारसंघापैकी पुणे, यवतमाळ, आणि नंदूरबार हे तिन्ही मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार आहेत. तर रखडलेले मतदारसंघापैकी अहमदनगर, औरंगाबाद, सिंधुदुर्ग आणि रावेर या मतदारसंघावर अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे यापुढेही बोलणी सुरु होणार आहेत. दरम्यान, रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे  रायगडच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीचे नेत अजित पवार यांनी माजी प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नावाची घोषणाच करुन टाकली आहे. त्याचवेळी बोलणी सुरु आहेत. जर ही  जागा मिळाली तर तटकरे हे शिवसेनेला टक्कर देण्याची शक्यता आहे.


या रखडलेल्या मतदारसंघाच्या अदलाबदलीवर अद्याप तोडगा निघाला नाही. परंतु येत्या १५ तारखेपर्यंत महाआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणालेत, नंदूरबार काँग्रेसकडे होता. तो काँग्रेसकडेच राहीला पाहीजे. चर्चा अद्याप सुरू आहे. लोकसभेला थेट भाजपशी स्पर्धा असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने लढण्यातच फायदा असल्याचे आता नेत्यांना समजले आहे आणि म्हणूनच मोदीं विरोधात लढताना जागा वाटपातील नाराजी लवकरात लवकर दूर करणे काँग्रेस राष्ट्रवादीला गरजेचे झाले आहे.


ज्या पक्षाच्या सर्वाधिक जागा तो पंतप्रधान पदाच्या जवळ जाणार हे जाहीर सूत्र आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची शेवटची इनिंग आहे. त्यामुळे एक एक जागा पवार यांच्यासाठी महत्वाची आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पहिली इनिंग सुरू झाली असल्यामुळे त्यांच्यासाठीही लोकसभेची एक एक जागा महत्वाची असणार आहे. यात दोन पावले मागे कोण जाणार, हे पाहण गरजेचे आहे. त्यावरच आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.