`८ लाख उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकर माफ करा`
वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकर माफ करावा, अशी मागणी शिवसेनेने सोमवारी केली.
मुंबई - वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकर माफ करावा, अशी मागणी शिवसेनेने सोमवारी केली. येत्या शुक्रवारी लोकसभेमध्ये पुढील आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून ही मागणी करण्यात आली आहे. ज्याचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये आहे. ते करमुक्त करण्यात यावे. त्यावर कोणताही प्राप्तिकर आकारू नये, असे शिवसेनेने म्हटले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी ही माहिती दिली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला पक्षाचे सर्व खासदार उपस्थित होते. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांना नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण लागू केले आहे. हे आरक्षण देताना ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाची अट घालण्यात आली आहे. याचा अर्थ ८ लाख रुपये असलेली व्यक्ती गरीब आहे. मग आता वार्षिक ८ लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकरात सवलत देण्यात यावी. तशी तरतूद आगामी अंतरिम अर्थसंकल्पात करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेची असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
सोमवारी झालेल्या खासदारांच्या बैठकीत राफेलचा मुद्दा, त्यावर विरोधकांनी केलेले आरोप यासोबत दुष्काळावरही चर्चा झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. दरम्यान, भाजपकडून युतीसंदर्भात कोणताही प्रस्ताव आला नसल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात शिवसेना स्वतःच्या अटी व शर्तींवर राजकारण करते आणि करत राहणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.