वाहनचालकांचा खोळंबा नको मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, पोलीस महासंचालक आणि आयुक्तांना आदेश
मुख्यमंत्री शिंदे यांनी आज (8 जुलै) पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा केली. तेसेच याबाबत आदेशही दिले.
मुंबई : मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेची पूर्ण खबरदारी घेतली जाते. मुख्यमंत्र्यांचा ताफा जात असताना संबंधित संपूर्ण रस्त्यावरील वाहतूक ही काही वेळेसाठी थांबवली जाते. त्यामुळे वाहतुकीचा नाहक खोळंबा तर होतोच. सोबतच वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. सर्वसामांन्याची ही चिडचिड नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेरून मोठा निर्णय घेतला आहे. (do not give special protocol on chief minister convoy during traveling eknath shinde give order to mumbai cp and dgp)
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे आदेशच शिंदे यांनी दिले आहेत. या संदर्भात शिंदे यांनी आज (8 जुलै) पोलीस महासंचालक रजनीश सेठ आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याशी चर्चा केली. तसेच याबाबत आदेशही दिले.
शिंदे काय म्हणाले?
"मुख्यमंत्र्यांच्या प्रवास मार्गिकेवरील पोलीस बंदोबस्त कमी करुन कुठेही वाहने अडवली जाऊ नयेत, याची खबरदारी घेण्यात यावी, अशी सूचनाही शिंदेंनी केली. तसेच हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. या सरकारमध्ये व्हीआयपींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य आहे, असंही शिंदे यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्र्यांना विविध कामानिमित्ताने राज्यभर प्रवास करावा लागतो. या प्रवासादरम्यान कोणताही अडथळा येऊ नये, तसेच कोणताही पेचप्रसंग उद्भवू नये , यासाठी त्या रस्त्यावरील वाहतूक काही वेळ रोखली जाते.
वाहतूक रोखल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. मुख्यमंत्र्यांना ताफा गेल्यानंतर पोलिसांना वाहतूक कोंडी सोडवावी लागते. यामुळे पोलिसांवरचा ताणही वाढतो. मुख्यमंत्री शिंदे यांना या काही गोष्टी लक्षात आल्या.
त्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागतो. अतिमहत्वाच्या कामांसाठी निघालेल्या लोकांचा खोळंबा होतो. रुग्णवाहिका त्या कोंडीत अडकून पडली तर रूग्णाच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर आपल्या या प्रवासाचा नाहक त्रास वाहनचालकांना नको, अशी मुख्यमंत्री शिंदे यांची भूमिका आहे.