तुम्हीही ब्रँडेड कंपन्यांचं पिशवीमधलं दूध वापरता का? तर ही बातमी तुमच्यासाठी?
पिवशीच्या दुधावर डोळे बंद करुन विश्वास ठेवला जातो. पण असं करणं तुम्हाला महागात पडू शकतं.
गणेश कवडे, झी २४ तास, मुंबई : तुम्ही ब्रँडेड कंपन्यांचं पिशवीमधलं दूध वापरत असाल, तर ही बातमी तुम्हाला सावध करणारी आहे. कारण मुंबईमध्ये दुधात भेसळ करणा-या रॅकेटचा पर्दाफाश झालाय. मात्र सातत्यानं दूधभेसळीचे अड्डे सापडत असल्यामुळे चिंता वाढलीये.
तुमच्या पिशवीत दूध की विष ?
मुंबईतल्या सांताक्रूझमधला एक व्हिडिओ समोर आला. ज्यामध्ये अमूल, महानंदा, अन्नपूर्णा या नामांकित कंपन्यांच्या पिशव्यांमध्ये भेसळयुक्त दूध भरण्याचा गोरखधंदा जांभळीपाड्यातील एका घरात सुरू होता. अन्न आणि औषध प्रशासनानं टाकलेल्या छाप्यात तब्बल 180 लीटर दूध जप्त करण्यात आलंय. इथे एका तरुणाला अटक करण्यात आलीये. तर बुधवारीही गोरेगाव आणि मालाडमध्ये छापा टाकून तिघांना अटक करण्यात आलीये.
नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ
ब्रँडवर विश्वास ठेवून आपण आपल्या मुलांना दूध देतो... मात्र ब्रँडेड दुधाच्या पिशव्यांमध्ये घाणेरडं पाणी वापरून भेसळयुक्त दूध बाजारात येतंय. अन्न आणि औषध प्रशासन छापे टाकून असे प्रकार रोखण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतंय. मात्र लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या भेसळमाफियांना चाप लावण्याची गरज आहे.
25 मे रोजी अंधेरीमध्येही अशाच पद्धतीनं दूधभेसळ करणारी टोळी पकडण्यात आली होती. त्यांच्याकडून तब्बल 300 लीटर भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं होतं. शिवाय भेसळीसाठी वापरलं जाणारं साहित्यही मोठ्या प्रमाणात हाती लागलं होतं.