सोन्याचे दर एवढे का वाढले माहित आहे का?
उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचण्यांचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे.
मुंबई : उत्तर कोरियाच्या बॉम्ब चाचणीमुळे सोन्याचे दर पुन्हा वाढलेत. गेल्या आठवड्यात २९ हजाराच्या घरात असलेले सोन्याच्या दरांनी आता ३० हजाराचा टप्पा ओलांडलाय. प्रतितोळा सोन्याचे दर २४१ रुपयांनी वाढले आहेत, सोन्याचा दर हा रु. ३० हजार ६४ वर पोहचलाय. त्यात जीएसटीची भर पकडल्यास हाच दर ३१ हजारावर पोहचणार आहे.
उत्तर कोरियाच्या हायड्रोजन बॉम्बच्या चाचण्यांचा परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झालीय. याचाच परिणाम म्हणून सोन्याचे दर वधारलेत. हायड्रोजन बॉम्ब चाचणीसोबतच सोन्याचे दर वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे भारत आणि दक्षिण कोरियामध्ये झालेला करार.
या करारानुसार, भारताने कोरियातून सोन्याची नाणी आयात केली तर त्यावर इम्पोर्ट ड्यूटी लागत नाही. गेल्या दोन महिन्यात दहा टन नाणी आयात झालीत. शिवाय त्यावर जीएसटीही लागत नव्हता. त्यामुळे सोन्याचा दर कमी होता. सरकारने हे सोनं बाजारात आणून ते वितळवलं. परंतु सरकारला अपेक्षित महसूल मिळाला नाही. तसंच दीड महिन्यानंतर ही आयात बंद झाल्याने सोन्याचे दर वधारल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी म्हटलं आहे.