विरार: विरारच्या ग्लोबल सिटीमध्ये काळ्या जादुसाठी प्राण्यांना डांबून ठेवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याठिकाणी तीन महिन्यांपूर्वी शेहजान जानी (वय ५०) ही महिला राहण्यासाठी आली होती. त्यावेळी तिने स्वत:सोबत दोन मांजरीही आणल्या होत्या. यानंतर अनेकदा तिच्या घरातून रात्री-बेरात्री मांजर आणि कुत्र्यांचा आवाज येत असे. मात्र, रहिवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, सोमवारी शेहजान जानी यांच्या घरातून दुर्गंध यायला लागल्याने नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी शेहजान यांच्या घराची झडती घेतली असता धक्कादायक गोष्ट समोर आली. 


या घरामध्ये तब्बल ३० प्राण्यांना डांबून ठेवण्यात आले होते. या सर्वांना अत्यंत क्रूर वागणूक मिळाल्याचेही दिसून आले. संपूर्ण घरात प्राण्यांची विष्ठा आणि मांजर आणि कुत्र्यांच्या शरीराचे काही अवशेश सापडले. पोलीस घरात शिरले तेव्हा हे सर्व प्राणी सैरभैर अवस्थेत फिरत होते. शेहनाज यांनी कोणालाही पत्ता न लागू देता हे प्राणी घरात आणले. त्यामुळे या प्राण्यांना बेशुद्धावस्थेत घरात आणल्याचा संशय आहे. याप्रकरणी शेहजान यांच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. नुकताच नालासोपाऱ्यात मांजर जाळण्याचा प्रकारही समोर आला होता. त्यामुळे या सगळ्या प्राण्यांच्या जीवावर नक्की कोण उठलंय. ही विकृती आहे की काळ्या जादूसाठी प्राण्यांचा वापर होतोय, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.