Crime News : मावस बहिणीच्या घरी चोरी केल्याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी (manpada police) एका महिलेला अटक केली आहे. या महिलेने आपल्या बहिणीच्याच घरी तब्बल 40 तोळे सोन्याची चोरी केली होती. डोबिंवलीतील (dombivali crime news) पलावा खोणी येथे हा सर्व प्रकार घडला आहे. पोलिसांनी 24 तासांच्या आत आरोपी महिलेला अटक केली आहे. चोरीच्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 तासांच्या आत आरोपीला अटक


मानपाडा पोलिसांनी सिमरन पाटील या महिलेला केवळ चप्पल आणि सीसीटीव्हीच्या मदतीने अटक केली आहे. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केल्याने सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. आरोपी महिला आणि तक्रारदार प्रिया सक्सेना 12 जानेवारी रोजी एका कार्यक्रमासाठी नवी मुंबईतील कामोठे येथे गेली होती. 13 जानेवारी रोजी रात्रीच्या गर्दीचा फायदा घेऊन आरोपी सिमरनने बहिणीच्या पर्समधून घराची, तिजोरीची चावी काढली. यासोबत घराचे एंट्री कार्डही हळूच चोरले. यानंतर आरोपी महिला रिक्षाने डोंबिवलीत बहिणीच्या घरी परतली.


चोरी पकडली जावू नये म्हणून महिलेची चालाखी


कोणालाही संशय येऊ नये म्हणून आरोपी महिलेने बहिणीचेच कपडे घातले होते. तर सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसू नये म्हणून तोंडाला स्कार्फ देखील बांधला. यानंतर पर्समधून चोरी केलेल्या चावीच्या मदतीने घरात प्रवेश केला आणि तब्बल 40 तोळे सोने चोरी केले. आरोपी महिलेने चोरी केलेले दागिने एका डॉक्टर मित्राकडे ठेवायला दिले आणि पु्न्हा त्याच कार्यक्रमात पोहोचली.


मात्र बहिणीने पर्स तपासली असता तिला चाव्या गायब झाल्याचे लक्षात आले. मात्र घरी आल्या तेव्हा घराचे दरवाजे बंद असल्याचे आढळून आले. पण बहिणीच्या मनात संशयाची पाल चुकचुकल्याने तिने तिजोरी तपासली. यानंतर प्रिया सक्सेना यांना धक्काच बसला. यानंतर प्रिया यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेत तात्काळ तपास सुरु केला.


पोलिसांना सीसीटीव्ही तपासताना प्रिया यांची मावस बहिण सिमरन पाटील यांची वागणूक संशयास्पद वाटू लागली. तसेच सिमरन यांनी ड्रेस बदलल्याचेही पोलिसांच्या लक्षात आले. मात्र सिमरने घातलेली चप्पल तिच असल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता आरोपी सिमरनने गुन्हा कबुल केला आहे. दागिने आपणच चोरल्याचे 27 वर्षीय सिमरनने मान्य केले आहे.