आतिष भोईर, झी २४ तास, डोंबिवली  : डोंबिवली येथील लोढा हेवन परिसरात राहणाऱ्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे यांचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास सराव करून परतत असताना ही घटना घडली. मोरे यांनी आजपर्यंत विविध राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन केले होते. यावर्षीच्या स्पर्धा गाजवून जान्हवीला आपले रँकिंग कायम ठेवायचे होते. त्यासाठी ती अथक प्रयत्न सुद्धा करत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅरमच्या पटावरची ही क्वीन जान्हवी मोरे राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि सहा कांस्य पदकं तिच्या नावावर होती. ही सगळी बक्षीसं तिच्या कॅरममधल्या यशाची साक्ष देतात. जान्हवी कॅरम खेळात देशात टॉप फोरमध्ये होती. डोंबिवलीत राहणारी जान्हवी मित्राच्या घरी कॅरमचा सराव करुन निघाली.


लोढा सर्कल भागात येताच वाहतूक पोलिसांनी वाहतूक थांबवली होती. जान्हवी रस्ता ओलांडत होती. तेवढ्यात वाहतूक पोलिसाचा डोळा चुकवून एका भरधाव टँकरने जान्हवीला धडक दिली. त्यामध्ये जान्हवीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर टँकरचालकाला अटक करण्यात आलीय. 


यावर्षीच्या स्पर्धा गाजवून जान्हवीला रँकिंग कायम ठेवायचे होते. त्यासाठीच तिची तयारी सुरू होती. पण जान्हवीचे स्वप्न स्वप्नच राहिले. आता उरला फक्त झाकून ठेवलेला कॅरम आणि कॅरम क्वीन चटका लावून गेली.