धक्कादायक! डोबिंवली स्टेशन परिसरात भर रस्त्यात आढळला अज्ञाताचा मृतदेह
Dombivli News : डोंबिवली स्टेशन परिसरातील भर रस्त्यात हा सर्व प्रकार घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. सकाळी कामावर निघालेल्या डोबिंवलीकरां हे दृश्य पाहून घबराट पसरली आहे. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरु केला आहे
अतिश भोईर, झी मीडिया, डोंबिवली : डोबिंवलीकरांची शनिवारची सकाळ एका धक्कादायक घटनेने झाली आहे. डोंबिवली स्टेशन (dombivli station) परिसरात भर रस्त्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. स्टेशनजवळ असलेल्या रस्त्यातच या अज्ञात व्यक्तीने आपलं जीवन संपवलं. सकाळी लोकांनी पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. त्यानंतर पादचाऱ्यांनी या घटनेची माहिती डोंबिवली पोलिसांनी (dombivli police) दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो रुग्णालयात पाठवत पुढील तपास सुरु केला आहे.
शनिवारी सकाळी डोंबिवली स्टेशन परिसरात शुभ मंगल हॉलसमोर रस्त्याच्या बाजूला विद्युत पोलावर एका इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनामुळे स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास नागरिकांनी पाहिले आणि पोलिसांना माहिती दिली. रामनगर पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांना एक बॅग आढळून आली आहे. मात्र त्यामध्ये कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. त्यामुळे हा व्यक्ती कोठून आला, तो कोण आहे, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. रामनगर पोलीस या धक्कादायक घटनेचा पुढील तपास करत आहेत.
अँब्युलन्स बंद पडल्याने शिवसेनेच्या माजी आमदाराचा मृत्यू
दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत देसाई यांचे शुक्रवारी सकाळी डोंबिवलीत निधन झालं. सूर्यकांत देसाई हे 83 वर्षांचे होते. एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयात नेत असताना सूर्यकांत देसाई असलेली अँब्युलन्स रस्त्यातच बंद पडली. प्रयत्न करुनही अँब्युलन्स सुरु झाली नाही. त्यामुळे उपचारांअभावी सूर्यकांत देसाई यांचं निधन झालं.
सूर्यकांत देसाई यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. त्यावेळी सूर्यकांत देसाई यांची अँब्युलन्स रस्त्यातच बंद पडली. अँब्युलन्सला धक्का मारला तरी ती सुरु होत नव्हती. त्यामुळे दुसरी अँब्युलन्स बोलवण्यात आली. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. रुग्णालयात पोहचेपर्यंत सूर्यकांत देसाई यांचे निधन झाले होते.