गोष्टी तुटेपर्यंत ताणायच्या नसतात; खातेवाटपावर अजित पवारांचे सूचक वक्तव्य
अजित पवार यांचे हे वक्तव्य पाहता महाविकासआघाडीत वजनदार खाती मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती, हे स्पष्ट झाले आहे.
मुंबई: राज्यातील खातेवाटपावरून महाविकासआघाडीत चर्चांचे गुऱ्हाळ सुरु असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक सूचक वक्तव्य केले आहे. खातेवाटप मार्गी लावण्यासाठी बुधवारी मुंबईत महाविकासआघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खातेवाटपावरून काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्ष समाधानी आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी म्हटले की, आपण केवळ मागणी करायची असते. गोष्टी तुटेपर्यंत ताणायच्या नसतात. निवडणुकीत अनेक कार्यकर्ते उमेदवारी मागत असतात. मात्र, पक्षाने अंतिम उमेदवार कोण असेल, हे जाहीर केल्यानंतर सर्वजण कामाला लागतात. त्यामुळे आता खातेवाटपासंदर्भात तिन्ही पक्षांनी आपापल्या मागण्या मांडल्या आहेत. आता यासंदर्भातील अंतिम निर्णय हा मुख्यमंत्रीच घेतील, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच खातेवाटप जवळपास अंतिम झाले आहे. उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर केले जाईल, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेच्या खातवाटपाची चर्चा, कुणाला कोणतं खातं मिळणार?
अजित पवार यांचे हे वक्तव्य पाहता महाविकासआघाडीत वजनदार खाती मिळवण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार होऊनही खातेवाटप रखडले होते. मात्र, आज तब्बल साडेचार तास झालेल्या बैठकीत हे सर्व प्रश्न निकाली काढण्यात आल्याचे तुर्तास तरी दिसत आहे. दरम्यान, खातेवाटपाची चर्चा जवळपास पूर्ण झाली आहे. आज केवळ झाल्यामुळे त्याला अंतिम स्वरुप देता आले नाही. मात्र, उद्या संध्याकाळपर्यंत खातेवाटप जाहीर होईल, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.