मुंबई: हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात एकमेकांवर शाब्दिक आरोप-प्रत्यारोप करणाऱ्या शिवसेना आणि भाजपमधील द्वंद्व आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण, शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तून भाजपवर अत्यंत शेलक्या भाषेत टीका करण्यात आली आहे. शिवसेनेने भाजपचे ओझे फेकून दिले आहे. त्यामुळे आता ओठास लाली आणि तोंडास पावडर लावून खिडकीत बसलेल्यांनी खिडकीही बंद करून घ्यावी, असे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कायम भाजपची पालखी वाहणार नाही, असा शब्द मी बाळासाहेबांना दिला होता'


शिवसेनेने जनादेशाचा अनादर केला, या भाजपच्या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत प्रत्युत्तर दिले होते. मी कायम भाजपची पालखी वाहणार नाही, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता. भाजपशी युती तुटल्यामुळे शिवसेनेच्या पाठीवर असलेले ३० वर्षांचे राजकीय ओझे उतरल्याचे उद्धव यांनी म्हटले होते. त्यामुळे आता भाजपने खिडकीत बसून 'शुक शुक' करणे, शीळ मारून लक्ष वेधून घेणे, दरवाजे उघडे आहेत, आम्ही आजही वाटाघाटीस तयार आहोत, अशी डबडी वाजवणे बंद करावे. आपल्यात आता कोणतेही नाते उरलेले नाही, असा संदेश 'सामना'तून देण्यात आला आहे.



गेल्या काही दिवसांमध्ये भाजपच्या नेत्यांकडून आगामी काळात महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ होऊ शकते, अशी विधाने केली जात आहेत. महाविकासआघाडीचे तीन पक्षांचे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही भाजपकडून केला जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात अधुनमधून शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा उचल खाताना दिसतात. मात्र, 'सामना'च्या आजच्या अग्रलेखातून शिवसेनेने आम्हाला भाजपसोबत पुन्हा जुळवून घेण्यात कोणताही रस नाही, हे स्पष्ट केले आहे. 


वाणी संतांची पण वर्तणूक मंबाजीची; शिवसेनेचा भाजपला टोला