मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६२ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायांची पावलं दादर, शिवाजी पार्क येथे असणाऱ्या चैत्यभूमीकडे वळली आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून चैत्यभूमीवर येत महामानवाला अभिवादन करण्यासाठी म्हणून बुधवारी मध्यरात्रीपासूनच अनुयायांनी चैत्यभूमीपाशी दाखल झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाजातील अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्लक्षित  वर्गाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या वाटेत अमूल्य योगदान देण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि त्यांनी दिलेल्या मूलमंत्राबद्दल सारा देश त्यांचा ऋणी आहे. सर्वसामान्यांसाठी झटणाऱ्या याच महामानवाला आज देशभरातून मानवंदना देण्यात येत आहे. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिविर्वाण दिनानिमित्त सोमवारपासूनच राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांतील भीमसैनिकांनी शिवाजी पार्क येथे येण्यास सुरुवात केली. दरवर्षीप्रमाणेच यंदाही अनुयायांची होणारी गर्दी आणि एकंदर सर्व परिस्थिती पाहता मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून या साऱ्यामध्ये महत्त्वाचं आणि मोलाचं सहकार्य करण्याच आलं आहे. 


भीमसैनिकांसाठी शिवाजी पार्क येथे जवळपास एक लाख चौरस फुटांचा मंडप बांधण्यात आला आहे. त्यासोबतच अनुयायांना मैदानात राहण्याची आणि त्यांच्या जेवणाची, पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली आहे. पालिकेतर्फे शक्य ते सर्व सहकार्य करण्यात आलं असून भीमसैनिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आल्याचं मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केलं. 


पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या व्यवस्थांमध्ये जर कोणत्या त्रुटी आढळल्या तर त्याची माहिती अनुयायांनी द्यावी, त्यावर त्वरित लक्ष पुरवण्यात येईल, असंही ते म्हणाले. 


अनुयायांसाठी खास सुविधा


महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मुंबईतील दादर, माहिम परिसरात विशेष पोलीस व्यवस्था करण्यात आली आहे. 


लोकल गाड्यांचीही खास सोय अनुयायांसाठी करण्यात आली आहे. आरपीएफ, सीआरपीएफचे जवानही विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत. 


चर्चगेट, दादर, बोरिवली, अंधेरी या भागांमध्ये विशेष मदत केंद्रही स्थापन करण्यात आली आहे. 


दादर, माहिम रेल्वे स्थानकांवर उतरल्यानंतर चैत्यभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर ठराविक अंतरानंतर अनुयायांना वाट दाखवण्यासाठी म्हणून दिशादर्शक, मार्ग दाखवणारे फलक लावण्यात आले आहेत. 


मोठ्या संख्येने येणारे अनुयायी पाहता चैत्यभूमीवर जाण्यासाठीच्या दादर आणि माहिम स्थानकांवरच अनुयायी नीट उतरतील याची खात्री करुन घेतल्यानंतरच लोकल पुढे नेण्याचे आदेश मोटरमनला देण्यात आले आहेत.