मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांना अजून कोणतं खातं मिळणार हे स्पष्ट नसलं तरी ते आपल्या नेहमीच्या शैलीत जोमानं कामाला लागलेले दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी इंदू मिलची पाहणी केली. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीच्या आधारे आढावा घेतला. यावेळी अजित पवारांनी सर्व बारिकसारिक बाबी जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. स्मारकातल्या पार्किंगपासून ते सुरक्षा व्यवस्थेपर्यंत सर्वच बाबींचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी कॅबिनेटमंत्री नवाब मलिकही त्यांच्यासोबत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं की, 'पंतप्रधानांनी भूमीपूजन केल्यानंतर काम कुठेपर्यंत आलं ते पाहण्यासाठी आलो होतो. भव्य दिव्य स्मारक होत आहे ते पाहण्यासाठी आलो होतो. मुख्यमंत्र्यांनीही माहिती घेतली. या स्मारकाला भेट द्यावी असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे असं स्मारक बनत आहे. त्यामुळे त्या कामाची पाहणी करण्यासाठी आलो होतो. राज्य सरकार यासाठी लागणारा सर्व खर्च करणार आहे. लवकरात लवकर हे स्मारक व्हावं यासाठी आढावा घेतला. कामात काही अडथळा येणार नाही.'


'मागच्या कॅबिनेटने घेतलेले निर्णय बदलायचे असेल तर कॅबिनेटमध्ये निर्णय घेतले जातात. २ वर्षात हे स्मारक पूर्ण करण्याचं ध्येय ठेवलं आहे. मागचं काढण्यात आता अर्थ नाही. मागच्या सरकारने काही परवानगी घेतल्या आहेत. हे स्मारक राज्य सरकारच्याच अधिपत्याखाली येणार असल्याने काही अडचणी येणार नाहीत. केंद्र सरकारच्या परवानगीची गरज भासणार नाही.'


'वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असतात. त्यानुसार आढावा घेतला. अनुभवातून जे सांगता आलं ते सांगितलं. सकारात्मक चर्चा झाली. आमचं काम निधी देणं आहे. आमच्याकडून निधी कमी पडू देणार नाही. कॅबिनेटची परवानगी या महिन्यातच देण्याचा प्रयत्न करु. जानेवारीपर्यंत संपूर्ण मान्यता त्यांना पूर्ण करुन देणार. त्यानंतर काम जोमानं सुरु होईल. येत्या २ वर्षात १४ एप्रिल २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहिल.'