मुंबई : विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी शिवसेनेने डॉ. दीपक सावंत यांच्या ऐवजी विलास पोतनीस यांना संधी देण्यात दिली आहे. दीपक सावंत यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धक्का दिला आहे. विलास पोतनीस बोरीवलीचे विभागप्रमुख आहेत. तसेच लोकाधिकार समितीचे गेली अनेक वर्षे ज्येष्ठ पदाधिकारी देखील आहेत. डॉ. दीपक सावंत हे राज्यमंत्री मंडळात आरोग्यमंत्री आहेत. गेली 18 वर्ष ते विधानपरिषद आमदार आहेत. दीपक सावंत यांचा पत्ता कट केल्याने सावंत यांची राजीनामा देण्याची मानसिक तयारी आहे. पण उद्धव ठाकरे यांचा अद्याप निर्णय आलेला नाही. नियमानुसार अजून 6 महिने सावंत मंत्रीपदावर राहू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण मुंबई पदवीधर मतदार संघ निवडणुकीत पक्ष नेतृत्वाने पुन्हा संधी नाकारल्याने डॉ. सावंत व्यथित आहेत.पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी गेले अनेक दिवस डॉ. सावंत यांचे प्रयत्न सुरु होते. पण सावंत यांच्या पदरी अखेर निराशा पडली आहे. सावंत यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांचा फोन नॉट रिचेबल लागत आहे.


डॉ. सावंत यांच्या आरोग्यमंत्रीपदाचे काय होणार?


1. पुढचे 6 महिने डॉ. दीपक सावंतच मंत्री राहू शकतात. उद्धव ठाकरे यांची याप्रकरणी भूमिका महत्त्वाची.


2. डॉ. सावंत यांचे आरोग्य मंत्रीपद शिवसेनेच्याच कॅबिनेट मंत्रयांपैकी एकाकडे अतिरिक्त जबाबदारी म्हणून सोपण्यात येऊ शकते.


3. शिवसेनेच्या राज्य मंत्रयांपैकी एकाला सावंत यांचे आरोग्य खात्याचे कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळू शकते. आणि विधान सभेतील एका आमदाराला राज्यमंत्रीपदी वर्णी लावून उद्धव ठाकरे पक्षात समतोल साधण्याचा  प्रयत्न करू शकतात. विधान सभेतील शिवसेनेच्या आमदारांमध्ये पक्षाच्याच ज्येष्ठ मंत्र्यांविषयी असलेली नाराजी दूर करण्याचाही या निर्णयातून प्रयत्न होऊ शकतो.