मुंबई : मुंबईतल्या बोगस लसीकरणातील मुख्य आरोपी मनीष त्रिपाठी याला पोलिसांनी अटक केली आहे. मनिष त्रिपाठी आज कांदिवली पोलिसांसमोर शरण आला. त्याआधी त्याने दिंडोशी सत्र न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती. मनीषवर अनेक गंभीर आरोप असून मनिषनेच बनावट लस पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. तसंच लसीकरणादरम्यान डाटा नोंद करण्यासाठी पासवर्ड चोरी करण्यासाठी मनीषकडूनच सांगण्यात आलं होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शहरात विविध ठिकाणी बोगस लसीकरण शिबिर आयोजित करून फसवणूक करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली होती. या प्रकरणी मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये 5 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर या प्रकरणी आता मुंबई पोलिसांकडून एसआयटी सुद्धा नेमण्यात आली आहे. या टोळीने कांदिवली, बोरिवली, वर्सोवा, खार अशा पश्चिम उपनगरांतील वेगवेगळ्या ठिकाणी ही बनावट लसीकरणाची खाजगी शिबिरं घेतली  होती.


बोगस लसीकरणाप्रकरणी 10 जणांना अटक


मुंबईत सुमारे 2 हजार लोकांना बोगस लसी देण्यात आल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी एकूण 10 जणांना अटक करण्यात आलीय. अटक आरोपींमध्ये शिवम हॉस्पिटलचे डॉक्टर शिवराज पटारिया आणि निता पटारिया यांचाही समावेश आहे. आरोपींकडून सुमारे 12 लाख रुपये जप्त करण्यात आलेत. धक्कादायक म्हणजे लसीऐवजी या भामट्यांनी चक्क सलाईनचं पाणी दिल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात पुढं आलीय. 


बोगस लसीकरणाचं पहिलं प्रकरण


कांदिवलीच्या हिरानंदानी हेरिटेज हाऊसिंग सोसायटीत सर्वात आधी बोगस लसीकरण घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर बोरिवलीच्या आदित्य कॉलेज आणि शिंपोली परिसरातील मानसी शेअर्स अॅण्ड स्टॉक अॅडव्हर्टायझर्स कंपनीनं आयोजित केलेल्या शिबिरात बोगस लसी देण्यात आल्या. वर्सोवा आणि खारमध्ये टिप्स कंपनीत, तर मालाडमध्ये बँक ऑफ बडोदामध्ये कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना बोगस लसी दिल्या. परळमध्ये पोद्दार एज्युकेशन सेंटरनं आयोजित केलेल्या शिबिरातही बोगस लसी दिल्याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.