Dussehra Melava 2022 : कार्यकर्त्यांना वडापाव, नेत्यांना पंचपक्वान्न
बीकेसीवर नेतमंडळींसाठी मेजवान्या, तर कार्यकर्त्यांसाठी रस्त्यावर वडापाव
Dussehra Melava : दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. मेळाव्याच्या निमित्तानं मुंबईची राजकीय युध्दभुमी होऊ पाहतेय. सेनेच्या दोन्ही गटात शाब्दिक वस्त्रहरण रंगणार आहे. दसरा मेळाव्यात गर्दी जमवण्यासाठी शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटाने (Thackeray Group) अभूतपूर्व असं नियोजन केलंय. लाखो कार्यकर्ते जमवण्यासाठी दोन्ही गटांनी कोट्यवधींचा खर्च केलाय. 10 हजारांहून अधिक एसटी बसेस (ST Bus), खासगी बसेस (Private Bus), गाड्या बुक करण्यात आल्या आहेत. त्यातून लाखो कार्यकर्ते दोन्ही मेळाव्यांसाठी जमवले जात आहेत.
नेत्यांसाठी पंचपक्वान्न
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाटी दोन ते तीन लाख येणार असल्याची शक्यता शिंदे गटाने व्यक्त केली आहे. या लोकांच्या खाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांसाठी पाच लाख वडापाव आणि फूड पॅकेट्सची सोय करण्यात आली आहे. तर दुसरीकडे बीकेसीमध्ये व्हीआयपी लोकांसाठी शाही थाट शाही जेवण ठेवण्यात आला आहे. आलू मटर,जीरा राईस, चपाती दाल तडका, असा खास मेनू नेत्यांसाठी आहे. आमदार, खासदार आणि त्यांचे पीए असा अडीच हार लोकांसाठी इथे पंचपक्वान्न जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
शिंदे गट जमवणार पुरावे
निवडणूक आयोगातील लढाईसाठी बीकेसी मैदानावरच शिंदे गट 'पुरावे' जमवणार आहे. उद्धव ठाकरे यांना आव्हान देत बीकेसी मैदानावरील दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी शिंदे गटाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावलीय. या मेळाव्यासाठी तब्बल तीन लाखांची गर्दी बीकेसी मैदानावर जमेल, असा अंदाज आहे. हीच संधी साधत एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या कोर्टातील लढाईसाठी पुरावे जमवण्याची योजना आखल्याची माहिती समोर आलीय.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी बीकेसी मैदानावर येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून सदस्य नोंदणीचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत. बीकेसी मैदान परिसरात येताच हे अर्ज कार्यकर्त्यांच्या हातात ठेवले जात आहेत. त्यामुळे आज एकाच दिवसात शिंदे गटाच्या शिवसेनेत लाखोंच्या संख्येने सदस्य नोंदणी होण्याची शक्यताय.
बाळासाहेबांच्या भाषणांचे व्हिडिओ
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या भाषणाचे जुने व्हिडिओ (Video) मंचावर दाखवल जाणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान हे व्हिडिओ दाखवले जाणार आहेत. बीकेसीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लिफ्टमधून स्टेजवर एन्ट्री करणार आहेत. हायड्रोलिक प्रकारची ही लिफ्ट आहे. व्यासपिठावर मेळाव्यासाठी 400 बाय 1200 फूटांचा मंचही तयार करण्यात आला आहे.
पोलिसांची कडकोट सुरक्षा
बीकेसी मैदानावर तीन हजार मुंबई पोलिसांचा ताफा दाखल झालाय. विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangare Patil) यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बीकेसी मैदानावरील सुरक्षेचा आढावा घेतला. मेळाव्यावेळी मोबाईल न वापरण्याचे निर्देश नांगरे पाटलांनी पोलिसांना दिलेत.