कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई :  दसरा मेळावा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. दसरा मेळाव्यात (Dussehra Melava) गर्दी जमवण्यासाठी शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गटाने (Thackeray Group) अभूतपूर्व असं नियोजन केलंय. लाखो कार्यकर्ते जमवण्यासाठी दोन्ही गटांनी कोट्यवधींचा खर्च केलाय. राज्यातील विविध भागातून हजारो कार्यकर्ते मुंबईत येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेळाव्याआधीच ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून आरोप-प्रत्यारोप होत असतानाच आता दोन्ही गटाचे कार्यकर्ते रस्त्यावरही आमने सामने आले आहेत. नाशिक मुंबई रोडवर ठाकरे गट आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला. नगरहून मुंबईकडे जात असलेल्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गाडीतून हात काढत महिला शिवसैनिकांना (Shivsainik) डिवचण्याचा प्रयत्न केला. 


यानंतर महिला शिवसैनिकांनी शिंद गटाच्या गाड्या थांबवून जाब विचारला. यावेळी ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांना गाडीतून बाहेर काढत चोपही दिला. दोन्ही गटाकडून सामंजस्याची भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात असताना तसं चित्र मात्र पाहिला मिळत नाही.


दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी
दसरा मेळाव्यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे.  10 हजारांहून अधिक एसटी बसेस, खासगी बसेस, गाड्या बुक करण्यात आल्या आहेत. त्यातून लाखो कार्यकर्ते दोन्ही मेळाव्यांसाठी जमवले जात आहेत. मुंबईत दसऱ्याला सुट्टी असल्याने इतर वाहनांची संख्या कमी असेल असं गृहीत धरून लाखो कार्यकर्ते महाराष्ट्रातून मुंबईत आणण्याचं नियोजन आहे. एवढी मोठी गर्दी आवरण्याचं आणि त्याचवेळी कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.