Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! वायू प्रदूषण नियंत्रणासाठी बीएमसीने घेतला महत्त्वाचा निर्णय
Brihanmumbai Municipal Corporation : धूळ नियंत्रणासाठी मुंबईतील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये मिळून ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करुन धुण्याची कामे हाती, १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ तैनात केले आहे. वायू प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांना वेग देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी व्यापक बैठक घेतली.
Mumbai Air Pollution : हवेतील प्रदुषणाला कारणीभूत ठरणारी धूळ नियंत्रित करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) उपाययोजनांना गती दिली आहे. याअंतर्गत सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीचे रस्ते, वर्दळीचे पदपथ स्वच्छ करुन ते पाण्याने धुवून काढण्याची कामे वेगाने केली जात आहेत. संपूर्ण मुंबई महानगरात मिळून सुमारे ५५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी पाण्याचे १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पुनर्प्रक्रिया केलेल्या तसेच स्थानिक स्रोतांमधील पाण्याचा यामध्ये प्रामुख्याने वापर केल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, वायू प्रदुषणाच्या निरनिराळ्या उपाययोजनांची प्रगती जाणून घेण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी आज (दिनांक ३ नोव्हेंबर २०२३) सर्व संबंधितांसह व्यापक बैठक घेतली.
मुंबई महानगरातील वायू प्रदूषण व त्यातही प्रामुख्याने धूळ नियंत्रणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने सक्रिय पावले उचलावीत, अशी सूचना महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली होती. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये युद्ध पातळीवर ही कामे सुरु करण्यात आली आहेत. यामध्ये रस्ते व पदपथ स्वच्छता हा देखील एक प्राधान्याचा विषय आहे.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. शिंदे यांच्या निर्देशांनुसार, रस्ते व पदपथ यावरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने वाहन आधारित धूळ प्रतिबंधक यंत्र (vehicle mounted anti-smog machines) कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यासोबतच, सर्व प्रशासकीय विभागांमध्ये प्रामुख्याने जिथे वर्दळ अत्याधिक आहे, अशा परिसरांमध्ये रस्ते, पदपथ यांची विशेष स्वच्छता तसेच पाण्याचे धुवून काढण्याची कार्यवाही वेगाने केली जात आहे. संपूर्ण मुंबई महानगरात मिळून सुमारे ६५० किलोमीटर लांबीचे रस्ते नियमितपणे स्वच्छ करुन धुवून काढण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी पाण्याचे १२१ टँकर व इतर संयंत्रे, मनुष्यबळ नेमण्यात आले आहेत.
दरम्यान, मुंबई महानगरातील प्रदूषण नियंत्रण कामांचा तसेच प्रगतिपथावर असलेल्या उपाययोजनांचा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी आज (दिनांक ३ नोव्हेंबर २०२३) सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त, संबंधित खाते यांची व्यापक बैठक घेतली. यामध्ये उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्रीमती चंदा जाधव, उपआयुक्त (पायाभूत सुविधा) श्री. उल्हास महाले यांच्यासह परिमंडळांचे उपआयुक्त, सहायक आयुक्त, खातेप्रमुख, घनकचरा विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त डॉ. शिंदे म्हणाले की, वातावरणातील बदलांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत आहे. परिणामी, हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. विशेषतः रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अधिक दक्षतेने कामे करण्यात यावी. धूळ प्रतिबंधक यंत्र (ऍण्टी स्मॉग मशीन) वाहने अधिकाधिक संख्येने तैनात करावीत. महानगरपालिकेने वायू प्रदूषणासाठी निर्गमित केलेल्या सुचनांप्रमाणे, बांधकाम साहित्य तसेच राडारोडा (डेब्रीज) ने-आण करणारी वाहने झाकलेली असावीत. राडारोडा वाहतूक करताना, प्रत्येक खेपेस त्यावर तुषार फवारणी करावी. प्रत्येक खेपेनंतर वाहनांची पूर्ण स्वच्छता करावी. राडारोड्याची वाहतूक करणा-या प्रत्येक वाहनांवर जीपीएस प्रणाली कार्यान्वित असावी, जेणेकरुन त्यांच्या हालचालींवर अद्ययावत निरीक्षण करता येईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यंत्रणेसोबत व्हेईकल ट्रॅकिंग अँड मॉनिटरिंग सिस्टम (VTMS) यंत्रणा लिंक करावी, असे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले आहेत. टोल प्लाझा स्वच्छतेसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांना सूचित करण्यात यावे, असेही त्यांनी निर्देश दिले.
घनकचरा विभागाच्या कार्यवाहीविषयी माहिती देताना उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्रीमती चंदा जाधव म्हणाल्या की, धूळ नियंत्रण मोहिमे अंतर्गत चोवीस प्रशासकीय विभागांतील ६० फुटांपेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर तसेच पदपथांवर दररोज विशेष स्वच्छता केली जात आहे. धूळ हटवण्यासाठी या रस्ते व पदपथांवर प्रारंभी ब्रशिंग करुन नंतर पाणी फवारणी केली जात आहे. ज्या रस्त्यांवर तसेच पदपथांवर अशी कार्यवाही करावयाची आहे, त्यांची निवड स्वतः विभाग कार्यालयांनी केलेली आहे. जिथे वाहनांची व नागरिकांची अधिक वर्दळ असते, अशा रस्ते व पदपथांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. रस्ते आदी स्वच्छतेसाठी आवश्यक सामग्री आणि संयंत्र आदींचा तपशीलवार आराखडा तयार केला जात आहे. पाणी टँकरची संख्या, प्रत्येक टँकर फेऱ्यांची वारंवारता आणि पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या पुरवठ्याचा सर्वात जवळचा स्रोत यांचा समावेश तपशीलवार आराखडयात करण्यात येत आहे. पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा त्याचप्रमाणे विभागातील पाण्याचे स्थानिक स्रोत जसे की, तलाव, विहीर, कूपनलिका यामधील पाण्याचा वापर करुन रस्ते व पदपथ धुतल्याने पिण्याच्या पाण्याची नासाडी होणार नाही, याची देखील काळजी घेतली जात असल्याचे श्रीमती जाधव यांनी नमूद केले.
पुढे त्या म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या उपाययोजना करताना, मुंबईकर नागरिकांच्या दैनंदिन जीवनमानात व्यत्यय येवू नये आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कमी वर्दळीच्या कालावधीमध्ये (ऑफ- पीक अवर्स) मध्ये विशेषत: पहाटे ३ ते सकाळी ६ दरम्यान रस्ते धुण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. तर काही विभागांमध्ये वर्दळ कमी असल्यास दुपारच्या अथवा सायंकाळच्या सत्रात ही कार्यवाही केली जात आहे. रस्ते व पदपथ धुण्याचे काम ३ ते ४ तासांत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी स्वच्छता करणाऱया वाहनांची संख्या वाढविण्यात येत आहे. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), मेट्रो, म्हाडा आणि इतर संबंधित संस्थांसमवेत समन्वय साधला जात आहे. रस्ते व पदपथ व एकूणच सर्व स्वच्छता कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.