मुंबई : Rohit Pawar on Nawab Malik ED Inquiry  : नोटीस न देता मंत्र्याला किंवा एखाद्या व्यक्तीला असे ताब्यात घेता येत नाही. भाजपविरोधात आणि केंद्राच्याविरोधात अनेक कागदपत्रे दाखवली. म्हणून ही कारवाई करण्यात येत आहे. गेल्या अनेक टप्प्यात उत्तर प्रदेशातमध्ये भाजपला यश मिळत नाही. छोटे नेते सहकार्य करीत नाही. त्यामुळे सत्ता मिळणे अवघड आहे. महाराष्ट्रात अशी कारवाई केली. त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात अशी कारवाई होईल, असा संदेश देण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. दरम्यान, मलिक यांनी रॅकेट उघड केले आहे. यात भाजपच्या नेत्यांचा सहभाग आहे. त्यामुळेच हे सगळे चालले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यावर आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक हे सातत्याने बोलत आहेत. ते सत्य बोलत आहेत. त्यामुळे चौकशीच्या नावाखाली ईडीकडून हा त्रास देण्यात येत आहे, असे ते म्हणाले.



ईडीच्या सेवेत असताना आम्ही सांगेल ती कामं करा आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला आमदारकी, खासदारकीचे बक्षीस देऊ, ही केंद्रीय संस्थांमधील अधिकाऱ्यांबाबत भाजपची मोडस ऑपरेंडीच बनली की काय असे वाटत होते. पण काही दिवसांपासून ही वस्तुस्थिती समोर असल्याचे दिसत आहे. कारण ED च्या 'सेवेत' असताना अनेक महत्त्वाच्या केसेसचा तपास हाती असलेल्या राजराजेश्वर सिंह या माजी अधिकाऱ्याला भाजपने उत्तरप्रदेशात विधानसभेची उमेदवारी दिली आहे. आता त्यांच्या प्रचारासाठी भाजपने महाराष्ट्रातील ED च्या प्रवक्त्यांनाही पाठवावं, असा भाजपला टोला रोहित पवार यांनी लगावला.



दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मलिक हे भाजपविरोधात बोलत आहेत. त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहे, असे पवार म्हणाले. मलिकांच्या कारवाईवर शरद पवार पुढे म्हणाले, सत्य बोलणाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न आहे. भाजपाविरोधात बोलत आहेत. त्यामुळे मलिकांवर कारवाई होणार याची खात्री होती. ती खरी ठरत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय वापर होत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे, असे ते म्हणाले.


तसेच मलिकांवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मलिकांना आधी काही नोटीस आली नव्हती, त्यामुळे काही चिंता वाटत नाही. सत्य बोलत असल्याने त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय,  असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.