मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळाप्रकरणी  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे काका, पुतणे चांगलेच अडचणीत आले आहेत. या गुन्हामुळे राष्ट्रवादीच्या गोठात जोरदार हलचल झाली आहे. निवडणुकीच्या धामधुमीत हे गुन्हे दाखल करण्यात आल्यानं राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 नियमबाह्यरित्या कर्ज वाटप केल्याचा आरोपानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीपराव देशमुख, ईश्वरलाल जैन, जयंत पाटील, शिवाजीराव नलावडे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, राजेंद्र शिंगणे आणि मदन पाटील यांच्यासह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे चेअरमनसह ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 


 राज्य सहकारी बॅंकेचा २५ हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे ईडीने म्हटले आहे. सहकारी बँकेचे आर्थिक स्थितीत कमकुवत असतानाही सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर करण्यात आले. कर्ज वाटप करताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता होती, असा ठपका ईडीने ठेवला आहे. दरम्यान, सहकारी साखर कारखाने काही विशिष्ट राजकारण्यांच्या जवळच्या नातेवाईकांना विकल्या गेल्याचा दावाही ईडीने केलाय. 


महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने अतिशय मनमानीने कर्ज वाटप केले होते. यामुळे बँकेला तब्बल १० हजार कोटींचं नुकसान झाले होते. या प्रकरणात अण्णा हजारे यांनी तीन वर्षांआधीच याचिका दाखल केली होती. याप्रकरणी चौकशी समिती देखील नेमण्यात आलेली होती. चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर अखेर कोर्टाने याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश  दिले. त्यानंतर तब्बल ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते.